आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती
पनवेल : रामप्रहर वृत्त
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत आदई डोंगरावर भव्य वृक्षारोपण अभियानाचे आयोजन करण्यात आले. या अभियानाला भाजपचे प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी त्यांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने दरवर्षी किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन केले तसेच वाढते प्रदूषण, हवामान बदल आणि जंगलतोड यामुळे वृक्षारोपणाचे महत्त्व अधिक वाढले असून पर्यावरण संरक्षणासाठी लोकसहभाग अत्यावश्यक असल्याचेही नमूद केले.
पनवेलमधील आदई हिल येथील वनविभागाच्या जागेत गेल्या १२ ते १३ वर्षांपासून विविध स्वयंसेवी संस्था व पर्यावरणप्रेमींच्या माध्यमातून सातत्याने वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाचे कार्य सुरू आहे. या कालावधीत १० हजारांहून अधिक झाडांची लागवड करण्यात आली असून त्यांचे संगोपनही स्वयंसेवकांच्या मदतीने केले जात आहे. स्थानिक नागरिकांच्या वर्गणीतून झाडांना पाणीपुरवठा करण्यासाठी दोन लहान बंधारे उभारण्यात आले आहेत, मात्र ते अपुरे पडत असल्याने त्यांच्या वरच्या बाजूस मलबा काढून आणखी दोन बंधारे उभारण्यात यावेत, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे करण्यात आली. यामुळे पाणी साठविण्याची क्षमता वाढून वृक्षसंवर्धनाला मोठी चालना मिळेल, असे पर्यावरणप्रेमींनी सांगितले तसेच मान्सूननंतर डोंगरावर लागणाऱ्या वणव्यांवर नियंत्रण, आग प्रतिबंधक उपाययोजना आणि वृक्षसंवर्धनासाठी शासनाची मदत मिळावी, अशीही मागणी करण्यात आली.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत वृक्षारोपण ही केवळ एका दिवसाची मोहीम नसून भावी पिढ्यांसाठीची अमूल्य गुंतवणूक असल्याचे सांगितले. प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले. वाढते प्रदूषण, हवामान बदल आणि जैवविविधतेचे संरक्षण यासाठी वृक्षांचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना स्पष्ट केले.
यावेळी पनवेल पंचायत समितीचे उपसभापती भूपेंद्र पाटील यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांचे रोप भेट देऊन स्वागत केले. कार्यक्रमास अरुण रोकडे, लक्ष्मण तळेकर, उत्तम ढेबे, डॉ. कृष्णा देसाई, किसन बोराटे, नागेश हिरवे, अतुल पोतदार, माजी सरपंच महादू शेळके, मंगेश भोपी, राजेश काकडे, नितीन वाघमारे, विजय हातिसकर, अविनाश मिंड, जनार्दन पाटील, श्रीचंद भंडारी, रोहित पाटील, किरण शेळके, विलास शेळके, ज्ञानेश्वर पाटील, सूरज म्हात्रे यांच्यासह शेकडो पर्यावरणप्रेमी व कार्यकर्ते उपस्थित होते. या पर्यावरण संवर्धन उपक्रमात पनवेल ट्रॅकर्स, आदई हिल हिरवाई ग्रुप, आदई हिल वृक्षारोपण व संगोपन ग्रुप, पनवेल आगरी-कोळी डॉक्टर्स असोसिएशन, संवेदना चॅरिटेबल ट्रस्ट तसेच आदई ग्रामस्थ मंडळ आणि भजनी मंडळ यांचे सहकार्य लाभत आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper