पॅरिस : वृत्तसंस्था
रॉजर फेडररने रविवारी क्ले कोर्टवरील फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत विजयी सलामी दिली. 2015नंतर प्रथमच फेडररने या स्पर्धेत विजय मिळवला आहे. नूतनीकरण पार पडलेल्या फिलिप कार्टिरर संकुलात पार पडलेल्या सलामीच्या लढतीत वीस ग्रँडस्लॅम जेतेपदांचा धनी असलेल्या फेडररने नवोदित लॉरेंझो सोनेगोला 6-2, 6-4, 6-4 असे नमवले. 2016मध्ये पाठदुखीमुळे फेडररने दुखापतीमुळे फ्रेंच ओपनमध्ये भाग घेतला नव्हता, तर 2017 व 2018मध्ये त्याने विम्बल्डनवर लक्ष केंद्रित करण्यासाठी फ्रेंच स्पर्धेत भाग न घेण्याचा निर्णय घेतला होता. 10 वर्षांपूर्वी फेडररने ही स्पर्धा जिंकली होती.
लढत पार पडल्यावर फेडररने प्रेक्षकांचे आभार मानले. ‘तुम्हाला खूप मिस केले. माझे खूप छान स्वागत केलेत. त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार. लढतीच्या सुरुवातीला मी थोडासा दडपणाखाली होतो,’ असे फेडरर म्हणाला. दरम्यान फ्रेंच ओपनच्या आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेच्या सॅम क्वेरीने स्पर्धेतून माघार घेतली आहे. पोटदुखीमुळे क्वेरीने हा निर्णय घेतला. ज्यामुळे प्राथमिक फेरीत पराभव होऊनही हेंरी लाकसोनेनला स्पर्धेत ‘लकी लुझर’ म्हणून प्रवेश मिळाला आहे. आता त्याची झुंज स्पेनच्या पेड्रो मार्टिन्झविरुद्ध होईल. कॅनडाच्या फेलिक्स अगर अलीअसिमनेही दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यामुळे स्पेनचा अलजेंद्रो डेव्हिडोविच फोकिना ‘लकी लुझर’ ठरला. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही निकोलस माहूत आणि त्याचा सात वर्षांचा मुलगा यांचे विजयी सेलिब्रेशन थेट टेनिस कोर्टवर बघायला मिळाले. गेल्या वर्षी फ्रेंच स्पर्धेत दुहेरीचे जेतेपद पटकावल्यानंतर माहूतसह त्याच्या मुलाने टेनिस कोर्टवर सेलिब्रेशन केले होते. रविवारी नूर थोडा वेगळा होता. एकेरीत जागतिक रँकिंगमध्ये 253व्या क्रमांकावर असलेल्या माहूतने दोन सेटची पिछाडी भरून काढत मार्को सेचिनातोचे आव्हान 2-6, 6-7 (6-8), 6-4, 6-2, 6-4 असे परतवून लावले. माहूत हा दुहेरीचा तज्ज्ञ खेळाडू आहे. त्यामुळे त्याचा एकेरीतील विजय कुतूहलाचा विषय ठरला. त्यात माहूत हा फ्रान्सचा असल्यामुळे घरच्या प्रेक्षकांचा त्याला छान पाठिंबा लाभला. माहूतने ज्या मार्कोला नमवले होते. त्याने गेल्या वर्षी नोव्हाक जोकोविचला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला होता. तसेच पुढे त्याने उपांत्य फेरीतही प्रवेश केला होता. त्यामुळेही माहूतने मिळलेला विजय महत्त्वाचा ठरतो. जागतिक रँकिंगमध्ये चौथ्या क्रमांकावर असलेल्या अँजलिक कर्बरला पराभवाचा धक्का बसला.