बंधारा पडला कोरडा; कोशिंबळे धरणही आटले, ग्रामस्थ तहानलेलेच

माणगाव : सलिम शेख
निजामपूर ग्रामपंचायत हद्दीतील काळ नदीवर उभारलेला विरोधा येथील बंधारा दोन महिन्यापुर्वीच कोरडा पडला असून, याच नदीवर असणारे कोशिंबळे धरणही आटल्याने निजामपूर व परिसरातील अनेक गावे आणि वाड्यांतील ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती सुरु झाली आहे.
माणगाव तालुक्यातील निजामपूर तसेच परिसरातील चार गावे आणि 10 वाड्यांची मिळून लोकसंख्या सुमारे 16हजार आहे. काळ नदीवर बेतलेल्या विंधनविहिरीचे पाणी, पंपाद्वारे साठवण टाकीत सोडून ते गेल्या अनेक वर्षापासून निजामपूर व परिसरातील गावांना पुरविले जाते. याच काळ नदीवर 45 वर्षापुर्वी कोल्हापूरी पद्धतीचा बंधारा बांधला आहे. विरोधायेथील या बंधार्यातील पाण्याचा परिसरातील ग्रामस्थांना उपयोग होत होता. मात्र अनेक वर्षे दुरूस्ती न केल्याने या बंधार्यातील पाणी वाहून गेले. त्यामुळे ग्रामपंचायतीने दोन महिन्यापुर्वी निजामपूर व परिसरातील गावांना दिवसाआड पाणी सोडण्याची दवंडी दिली होती. त्यानंतर ग्रामपंचायतीने नदीतील पाणी उचलले. मात्र आता तेही आटले आहे. काळ नदीच कोरडी पडल्याने निजामपूर आणि परिसरातील गावांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. निजामपूर व परिसरातील चार गावे आणि 10 वाड्यांतील ग्रामस्थ सध्या बैलगाडी तसेच टँकरचे पाणी विकत घेत आहेत.
दरम्यान, निजामपुर ग्रामपंचायतीने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी माणगाव पंचायत समिती, तहसिलदार, प्रांत यांच्याकडे केली होती. मात्र आजतागायत त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे सरपंच राजाभाऊ रणपिसे, ग्रामपंचायत सदस्य व काही ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालया सामोर उपोषणाला बसणार आहेत.
गळतीमुळे कोशिंबळे धरण कोरडे
काळ नदीवर कोशींबळे येथील धरणाच्या दोन दरवाजांमध्ये रबर सील टाकावे लागते, ते लघु पाटबंधारे खात्यांने टाकले नाहीत. त्यामुळे या दरवाजातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होऊन धरण लवकरच आटते. धरणाची पावसाळा सुरु होण्यापुर्वी दुरुस्ती झाली नाही तर, पुढील उन्हाळ्यातही येथील ग्रामस्थांच्या नशिबी पाणी टंचाई राहणार आहे. याच काळ नदीवर आरसीसी पद्धतीचे पक्के धरण उभारल्यास निजामपूर व परिसरातील अनेक गावांचा पाणी प्रश्न कायमचा निकाली निघू शकेल.
पाणीपुरवठा योजना मोडकळीस
विरोधा बंधारा ते साठवण टाकी हे सुमारे 1.5 कि.मी अंतर आहे. 40वर्षापुर्वी जलवाहिनी टाकून विरोधा येथून साठवण टाकीत पाणी सोडले जाते. तेथून ते शुद्धीकरण करून निजामपूरकरांना नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो. मात्र या योजनेतील पाणी शुद्धीकरण यंत्रणा गेल्या पाच-सहा वर्षापासून बंद आहे, जलवाहिन्या ठिकठिकाणी फुटल्या आहेत, पंपदेखील सतत नादुरूस्त होत असतात. साठवण टाकीचे छत कधी कोसळेल याचा भरवसा नाही. त्यामुळे निजामपूरचा पाणी पुरवठा सतत खंडीत होत असतो. मात्र त्याकडे ग्रामपंचायत, पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेने कधीच गांभिर्याने पाहिले नाही. 50 वर्षापुर्वीची ही नळपाणीपुरवठा योजना मोडकळीस आल्याने ग्रामस्थांना या पाणीटंचाईशी सामना करावा लागत आहे.