महिला सबलीकरण आणि कॅन्सर जागृतीसाठी स्पर्धा
पनवेल ः रामप्रहर वृत्त
खारघर सेंट्रल पार्क येथे रविवारी (दि. 5) महिला सबलीकरण आणि कॅन्सर जागृतीसाठी आयोजित करण्यात आलेली शी रन 2025 ही धावण्याची स्पर्धा उत्साहात झाली. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते.
पीसीसी कॅन्सर केअर अॅण्ड रिसर्च सेंटर तसेच सोशल आर्किटेक्ट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. सकाळी 5 वाजता सुरू झालेल्या या स्पर्धेत महिला आणि युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. महिलांच्या आरोग्यविषयक जाणीवा वाढविणे आणि समाजात समानतेचा संदेश पोहचविणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
भाजप उत्तर रायगड जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल, पीसीसी कॅन्सर केअर अॅण्ड रिसर्च सेंटरचे डॉ. पुष्कर चिरमाडे, डॉ. अमित चक्रवर्ती, डॉ. जयेश गोरी, डॉ. डोनाल्ड बाबू, डॉ. विकास गुप्ता, डॉ. नीता नायर, डॉ. योगेश बनसोडे, डॉ. निखिल राणे यांच्यासह विविध मान्यवरांनी उपस्थित राहून उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी महिलांच्या सहभागाचे कौतुक करताना सांगितले की, महिला सक्षम झाल्या तर समाज अधिक सक्षम होतो. आपण सगळे आपल्या आयुष्यात कुटुंबासोबतचा दीर्घ सहवास इच्छितो, परंतु आज ज्या परिस्थितीत आपण जगत आहोत, त्यामध्ये आपण जे अन्न खातो, जशी जीवनशैली जगतो त्यात अनेकदा आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते आणि नकळत आपण कर्करोगाला आमंत्रण देतो. आपल्याला जर आपल्या कुटुंबासोबत दीर्घायुष्य जगायचे असेल, तर कर्करोगाबाबत जागरूकता असणे तितकेच आवश्यक आहे आणि याच उद्देशाने आज पीसीसी कॅन्सर केअर अॅण्ड रिसर्च सेंटर व सोशल आर्किटेक्ट्स फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मॅरेथॉनच्या माध्यमातून नक्कीच या विषयाबाबत जनजागृती वाढेल. अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, असेही ते पुढे म्हणाले.
स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानचिन्हे आणि प्रमाणपत्रे देण्यात आली तसेच आयोजकांच्या वतीने सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानण्यात आले.
RamPrahar – The Panvel Daily Paper