पनवेल ः रामप्रहर वृत्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी (दि.8) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी पंतप्रधानांनी प्रकल्पग्रस्तांचे झुंझार लोकनेते दिवंगत दि.बा. पाटील यांच्या कार्याचे स्मरण व गौरव केला. उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करून त्यास दाद दिली.
या सोहळ्याला व्यासपीठावर महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री किंजरापु राममोहन नायडू, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, केंद्रीय नागरी उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री सर्वश्री गणेश नाईक, आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा, माधुरी मिसाळ, आदिती तटकरे, प्रताप सरनाईक, भरत गोगावले, भारतातील जपानचे राजदूत ओनो केईची, अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी, खासदार श्रीरंग बारणे, धैर्यशील पाटील, आमदार सर्वश्री प्रशांत ठाकूर, महेश बालदी, मंदा म्हात्रे, विक्रांत पाटील आदी उपस्थित होते. या सोहळ्याला माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, आमदार निरंजन डावखरे, आमदार चित्रा वाघ, आमदार महेंद्र थोरवे यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी आणि विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
नवी मुंबईचे प्रदीर्घ काळाचे स्वप्न आज पूर्ण झाले आहे. मुंबईला अखेर दुसरे विमानतळ मिळाले आहे तसेच या शहराला भूमिगत मेट्रोही मिळाली आहे. भूमिगत मेट्रो हा विकसित भारताचे चित्र आहे. या विकासकामात योगदान देणार्या सर्वांचे मी अभिनंदन करतो. नवी मुंबई विमानतळ हे समृद्धी आणि विकासाचे प्रतीक ठरेल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.
या विमानतळाच्या उद्घाटनाबद्दल मी महाराष्ट्रातील जनतेचे अभिनंदन करतो. महाराष्ट्राचे सुपूत्र लोकनेते दि.बा. पाटील यांचेही स्मरण करतो. त्यांनी समाज, शेतकर्यांसाठी ज्या सेवाभावाने काम केले ते आमच्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार पंतप्रधान मोदींनी या वेळी काढले.
आज कौशल्य विकासासंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आला आहे. भारत हा तरुणांचा देश आहे. सध्याचा काळ हा देशातील तरुणाईला विविध संधी उपलब्ध करून देणार आहे. संपूर्ण देश हा विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी प्रयत्नशील आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
विजयादशमी झाली, कोजागिरी झाली, तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा, अशा मराठीत पंतप्रधानांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्ही वर्षानुवर्षे हे विमानतळ होणार असे ऐकायचो. मोदींजींकडे बैठक घेतली आणि 15 दिवसांत विमानतळाच्या कामाला मंजुरी मिळाली. आजचा दिवस स्वप्नपूर्तीचा आहे. या विमानतळामुळे राज्याचा जीडीपी एक टक्क्याने वाढणार आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हात लागतो, तिथे सोने होते. नवीन भारताचा संकल्प हा मोदींच्या विश्वासाचे प्रतीक आहे, असे सांगितले, तर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, आजचा दिवस केवळ मुंबईच नाही, तर महाराष्ट्रासाठी मोठा आहे. नवी मुंबई विमानतळाच्या उभारणीचा प्रवास इतका सोपा नव्हता. तो आता पूर्ण झाला आहे. केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री किंजरापु राममोहन नायडू, राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचीही समयोचित भाषणे झाली.
Check Also
सुभाष घईंच्या दिग्दर्शनाची यशस्वी पन्नाशी
तुम्हालाही माहित्येय आज आपण डिजिटल युगात वावरतोय, चित्रपट माध्यमात व्हीएफएक्स आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढलाय, …
RamPrahar – The Panvel Daily Paper