Breaking News

मोरबे धरणातील पाण्याचे न्याय्य वाटप आणि रायगड जलसंपदा नियामक प्राधिकरण स्थापन करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे मागणी

मुंबई : रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्यातील झपाट्याने वाढणारे नागरीकरण, औद्योगिकीकरण, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना प्रकल्प तसेच सिडकोच्या विस्तारामुळे पिण्याच्या पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत असून भविष्यात ती अधिक गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मोरबे धरणातील पाण्याचे न्याय्य व नियोजनबद्ध वाटप करण्याची तसेच रायगड जलसंपदा नियामक प्राधिकरण स्थापन करण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास विभागाचे मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पनवेल महापालिकेलगतच्या विचुंबे, पळस्पे, कोळखे, उसर्ली, देवद, पाली देवद, आकुर्ली, आदई आदी ग्रामपंचायत क्षेत्रांमध्ये तसेच सिडको व नैना क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गृहनिर्माण प्रकल्प उभे राहत असून लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे, मात्र या भागांना नवीन जलजोडण्या मिळण्यात अडचणी येत असल्याने पाणीटंचाईची समस्या निर्माण होत आहे. मोरबे धरण नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील एक महत्त्वाचा जलस्रोत असून त्यातील बहुतांश पाणी नवी मुंबई महापालिकेकडून वापरले जात असल्याचे चित्र आहे.
सिडको क्षेत्रातील खारघर, कामोठे, तळोजा, नवीन पनवेल आदी वसाहती तसेच आगामी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना प्रकल्प व औद्योगिक विकासामुळे भविष्यातील पाणी मागणी लक्षणीयरीत्या वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांचे एकात्मिक जलनियोजन सुनिश्चित करण्यासाठी रायगड जिल्ह्यासाठी स्वतंत्र जलसंपदा नियामक प्राधिकरण स्थापन करण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली असून मोरबे धरणातील उपलब्ध पाण्याचे वैज्ञानिक मूल्यमापन, पनवेल महापालिका, सिडको, नैना क्षेत्र, ग्रामपंचायत व औद्योगिक क्षेत्रांसाठी स्वतंत्र जलकोटा निश्चित करणे, जलस्रोतांचा एकाधिकार टाळणे, दीर्घकालीन लोकसंख्या व विकास आराखड्यानुसार जलनियोजन, सिडको व लगतच्या ग्रामपंचायत क्षेत्रांसाठी राखीव जलकोटा निश्चित करणे, जलवाटपातील प्राधान्य व वाद निवारण व्यवस्था निश्चित करणे आदी अधिकार या प्राधिकरणास देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन रायगड जिल्ह्यासाठी स्वतंत्र जलसंपदा नियामक प्राधिकरण स्थापन करण्याबाबत तातडीने उच्चस्तरीय बैठक आयोजित करावी तसेच मोरबे धरणातील उपलब्ध पाण्यातून सिडको क्षेत्र, नैना क्षेत्र आणि पनवेल महापालिकेलगतच्या वाढत्या ग्रामपंचायत क्षेत्रांसाठी स्वतंत्र व कायदेशीर संरक्षित जलकोटा निश्चित करण्याबाबत आवश्यक धोरणात्मक निर्णय घ्यावेत, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे. या निर्णयामुळे रायगड जिल्ह्याच्या दीर्घकालीन जलसुरक्षेला बळ मिळेल व भविष्यातील पाणीटंचाई टाळता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

Check Also

राज्यातील जलप्रदूषणाच्या गंभीर प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांचा विधिमंडळात आवाज

मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यात जलप्रदूषणाच्या समस्येमुळे नद्या, तलाव, धरणे, खाड्या, भूजल तसेच किनारी भागांच्या पर्यावरणावर …

Leave a Reply