Breaking News

उरण-नेरूळ रेल्वे फेर्‍यांत वाढ; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवयांचे आमदार महेश बालदी यांनी मानले आभार

उरण : रामप्रहर वृत्त
उरण-नेरूळ रेल्वे मार्गावरील फेर्‍यांमध्ये वाढ करण्याच्या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल आमदार महेश बालदी यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. उरण परिसरातील नागरिक, दैनंदिन प्रवासी, विद्यार्थी, महिला व व्यावसायिक यांच्या वाढत्या मागणीची दखल घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
आमदार महेश बालदी यांची मागणी व सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर रेल्वे मंत्रालयाने मंजूर केलेल्या वाढीव लोकल फेर्‍या नववर्षाच्या प्रारंभी सुरू होणार आहेत. निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर सकाळी 6.05 वाजता सुटणारी पहिली गाडी तसेच रात्री उशिरा धावणार्‍या अतिरिक्त लोकल्स यांचा औपचारिक शुभारंभ रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते होणार आहे. फेर्‍यांच्या वाढीमुळे उरण, जासई, खारकोपर, गव्हाण आणि नेरूळ या परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
उरण-नेरूळ मार्ग हा उरण उपनगरे, जेएनपीटी क्षेत्र, औद्योगिक पट्टा तसेच नवी मुंबई-मुंबईमध्ये कामधंद्यासाठी प्रवास करणार्‍या नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. वाढीव फेर्‍यांमुळे प्रवासाचा वेळ कमी होऊन सकाळ-संध्याकाळच्या गर्दीचा ताणही कमी होणार आहे. या भेटीत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रकल्पासंदर्भातील पुढील आवश्यक सुविधांच्या पुरवठ्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली. रेल्वेसेवांचा विस्तार हा सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनमान उंचावण्यासाठी महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी नमूद केले. उरण-नेरूळ रेल्वे फेर्‍यांमध्ये वाढ होणे हा उरण व आसपासच्या परिसरासाठी विकासाचा महत्त्वाचा टप्पा ठरेल तसेच दैनंदिन प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित व सोयीस्कर बनेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. रेल्वेमंत्र्यांनी केलेल्या विशेष सहकार्याबद्दल आमदार महेश बालदी यांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानून धन्यवाद दिले.

Check Also

गिरवलेचे सरपंच प्रताप हातमोडे भाजपमध्ये दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तगिरवले गावचे सरपंच प्रताप चंद्रकांत हातमोडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षामध्ये …

Leave a Reply