Breaking News

झालमुरी, एसडी, आरडी आणि सुरांची अवीट मैफल!

‌‘पुरवैय्या‌’ने पनवेलकरांना दिली अविस्मरणीय सांगीतिक पर्वणी

पनवेल : रामप्रहर वृत्त
पश्चिम बंगालने हिंदी चित्रपटसृष्टीला अनिल विश्वास, सलील चौधरी, सचिनदेव बर्मन, राहुलदेव बर्मन, हेमंत कुमार आणि किशोर कुमार यांसारखे दिग्गज संगीतकार, गायक दिले. त्यांच्या अजरामर सुरांनी अनेक पिढ्यांच्या भावना व्यक्त करत भारतीय संगीतविश्व समृद्ध केले आहे. या सुवर्णकाळातील कालातीत गीतांचा सुरेल प्रवास उलगडणारा ‌‘पुरवैय्या‌’ हा विशेष सांगीतिक कार्यक्रम श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल यांच्या वतीने, भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख सहयोगाने तसेच वाय नॉट प्रॉडक्शन, फॅबल फॅक्टरी यांच्या वतीने येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मोठ्या उत्साहात सादर झाला.
बांगला संगीतकारांनी संगीतबद्ध केलेल्या मधुर हिंदी गीतांचा अनोखा सुरेल प्रवास या कार्यक्रमातून सादर करण्यात आला. सुरेल गायन, अप्रतिम वाद्यसंगत आणि भावपूर्ण सादरीकरणामुळे उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने संगीतप्रेमी उपस्थित होते. प्रत्येक गीताला रसिकांनी उत्स्फूर्त दाद देत कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.
सुरेल संगीत, जुन्या आठवणी आणि दर्जेदार सादरीकरण यांचा संगम असलेला ‌‘पुरवैय्या‌’ हा कार्यक्रम पनवेलकर रसिकांसाठी एक आगळावेगळा आणि अविस्मरणीय सांगीतिक अनुभव ठरला. हरहुन्नरी कलाकार पुष्कर क्षोत्री यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या सांगीतिक मैफलीने एस.डी. बर्मन, आर.डी. बर्मन आणि इतर दिग्गज संगीतकारांच्या गाजलेल्या गीतांनी सभागृहात अविस्मरणीय वातावरण निर्माण झाले.
या सांगीतिक सोहळ्यास प्रमुख मान्यवर म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी शकुंतला ठाकूर, भाजपचे प्रवक्ते आणि उपाध्यक्ष केशव उपाध्ये, प्रदेश सचिव आमदार प्रशांत ठाकूर, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, महापौर नितीन पाटील, नगरसेवक सुमित झुंजारराव, नगरसेविका प्रीती जॉर्ज, रूचिता लोंढे, शहर सरचिटणीस रूपेश नागवेकर, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, चिन्मय समेळ यांच्यासह लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि मोठ्या संख्येने संगीतप्रेमी उपस्थित होते.
कार्यक्रमात गायक अजित परब, गायिका अर्चना गोरे आणि मुक्ता जोशी यांनी अजरामर गाण्यांचे प्रभावी सादरीकरण केले, तर निवेदक पुष्कर क्षोत्री व योगिनी पोफळे यांनी प्रत्येक गीतामागील रंजक कथा, आठवणी आणि संदर्भ रसिकांसमोर उलगडत कार्यक्रमाची रंगत अधिक खुलवली. प्रत्येक सादरीकरणानंतर दणाणून उठणाऱ्या टाळ्या आणि ‌‘वन्स मोअर‌’च्या आरोळ्यांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे अधोरेखित केले.
मध्यंतरात प्रेक्षकांसाठी पश्चिम बंगालची प्रसिद्ध झालमुरी ही चटकदार खाद्य मेजवानीही होती. त्यामुळे सुरेल संगीतासोबतच बंगाली चवीचाही अनोखा अनुभव उपस्थितांना घेता आला. झालमुरीचा खमंग स्वाद आणि एसडी-आरडी यांच्या अजरामर सुरांची जादू यांचा अनोखा संगम घडवून आणणाऱ्या ‌‘पुरवय्या‌’ या कार्यक्रमाने पनवेलकरांना अविस्मरणीय सांगीतिक पर्वणीचा आनंद दिला. पनवेलच्या सांस्कृतिक जीवनात सातत्याने दर्जेदार कार्यक्रमांची भर घालण्याच्या या प्रयत्नांमुळे शहराचे सांस्कृतिक वैभव अधिक समृद्ध होत असल्याची भावना उपस्थितांनी यावेळी व्यक्त केली.

Check Also

आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत स्वस्तिका घोषची दमदार कामगिरी

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय महिला टेबल टेनिसपटू स्वस्तिका घोष हिने …

Leave a Reply