Breaking News

पनवेलमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजप महायुतीचा ऐतिहासिक विजय

शेकापचा सुपडा साफ!

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप महायुतीने शेतकरी कामगार पक्ष महाविकास आघाडीचा दारुण पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. जिल्हा परिषदेच्या आठपैकी आठ, तर पंचायत समितीच्या 16 पैकी 15 जागांवर भाजप महायुतीने विजय मिळवला. दीर्घकाळ शेकापच्या ताब्यात असलेला गड महायुतीने उद्ध्वस्त करत शेकापचा सुपडा साफ केला असून पनवेल पंचायत समितीवर एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे.
या विजयामुळे पनवेल तालुक्यात शेकापची जुलमी व दडपशाहीची सत्ता उलथवून लावण्यात भाजप महायुतीला मोठे यश मिळाले आहे जनतेने विकास, पारदर्शकता व सक्षम नेतृत्वावर आपला ठाम विश्वास व्यक्त केला. निवडणूक निकालानंतर संपूर्ण पनवेल तालुक्यात आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण झाले. भाजप महायुतीचा विजय असो, एकच वादा प्रशांतदादा अशा जोरदार घोषणा देत कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे, राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली भाजप महायुतीने हा देदीप्यमान विजय मिळवला.
भाजप महायुतीच्या नेतृत्वाने पनवेल तालुक्यातील विकास, पायाभूत सुविधा, शेतकरी, युवक व महिला सक्षमीकरण या मुद्द्यांवर विश्वासार्ह भूमिका मांडली. याच भूमिकेला मतदारांनी भरभरून प्रतिसाद देत भाजप महायुतीला स्पष्ट कौल दिला आहे. या विजयामुळे आगामी काळात पनवेल तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला गती मिळणार असून जनतेच्या अपेक्षांना न्याय देण्यासाठी भाजप महायुती कटिबद्ध राहील, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.
गव्हाण जिल्हा परिषद गटातून निकिता निलेश खारकर, वावंजे जिल्हा परिषद गटातून कमला एकनाथ देशेकर, नेरे जिल्हा परिषद गटातून आत्माराम बाळू भस्मा, पाली देवद जिल्हा परिषद गटातून प्राची अमित जाधव, पळस्पे जिल्हा परिषद गटातून हर्षदा अतुल घरत, वावेघर जिल्हा परिषद गटातून अनन्या अविनाश गाताडे, वडघर जिल्हा परिषद गटातून सोनाली अनुज जितेकर, केळवणे जिल्हा परिषद गटातून मंगेश रामचंद्र वाकडीकर यांनी, तर गव्हाण पंचायत समिती गणातून जिज्ञासा किशोर कोळी, वहाळ पंचायत समिती गणामधून वितेश त्रिंबक म्हात्रे, वावंजे पंचायत समिती गणातून आरती कुणाल काठे, चिंध्रण गणातून अंकुश बाळाराम खैर, नेरे पंचायत गणातून वर्षा सचिन केवारे, आदई गणातील भूपेंद्र सदानंद पाटील, पाली देवद पंचायत समिती गणातून वैशाली प्रवीण सावंत, विचुंबे पंचायत समिती गणातून निलम प्रमोद भिंगारकर, पळस्पे पंचायत समिती गणातून राजेंद्र हरिश्चंद्र पाटील, कोन पंचायत समिती गणातून योगिता योगेश लहाने, वावेघर पंचायत समितीमधून राजू गणा पाटील, पोयंजे पंचायत समितीमधून अस्मिता अनंता पाटील, करंजाडे पंचायत समितीमधून रंजना सदाशिव वास्कर, वडघर पंचायत समितीमधून मनिषा गजानन पाटील आणि आपटा पंचायत समिती गणामधून मयुर परशुराम शेलार यांनी दणदणीत विजय मिळवला.
या सर्व विजयी उमेदवारांचे लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, अ‍ॅड. प्रकाश बिनेदार, माजी शहराध्यक्ष जयंत पगडे यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. या वेळी पनवेलमध्ये ढोलताशा, फटाक्यांची आतषबाजी आणि जयजयकाराच्या घोषणांनी विजयी जल्लोष साजरा करण्यात आला. ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे यांनी जल्लोषाच्यावेळी ’सुपडा साफ किया रे’ अशी जोरदार प्रतिक्रिया दिली.
या निवडणुकीत शेकाप महाविकास आघाडीने लोकशाही मूल्यांना तिलांजली देत विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्याऐवजी खोटे आरोप, अफवा आणि अपप्रचाराची राळ उडवण्याचे काम केले होते. समाजात संभ्रम निर्माण करून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. याउलट भाजप महायुतीने लोकशाही मार्गाचा अवलंब करत राज्यातील आणि देशातील विकासकामांचा ठोस लेखाजोखा जनतेसमोर मांडला. पायाभूत सुविधा, रोजगारनिर्मिती, शेतकरी, महिला, युवक, उद्योग, शिक्षण व आरोग्य या सर्व क्षेत्रांतील विकासकामे आणि भविष्यातील स्पष्ट दृष्टिकोन ठेवून महायुतीने निवडणूक लढवली.
विरोधकांच्या नकारात्मक राजकारणाला मतदारांनी स्पष्टपणे नकार दिला असून विकास, स्थैर्य आणि सक्षम नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे. हा निकाल म्हणजे लोकशाही मार्गाने, सकारात्मक विचारांनी आणि विकासाच्या अजेंड्यावर लढवलेल्या राजकारणाचा विजय झाला आहे.
पनवेल पंचायत समितीवर शेकापची अनेक वर्षे सत्ता राहिली, मात्र पंचायत समितीच्या माध्यमातून विकास दूरच राहिला. त्यामुळे शेकापच्या मनमानी कारभाराला जनता पुरती कंटाळली होती. नुकत्याच पार पडलेल्या पनवेल महापालिकेच्या निवडणुकीतही शेकाप महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला होता. त्यातच ताज्या निकालाने शेकापची पूर्ण दैना उडाली आहे. माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या कार्यपद्धतीला पनवेलची जनता कंटाळली असल्याने हा निकाल त्याचे बोलके चित्र असल्याची चर्चा पनवेलमध्ये रंगली आहे.

Check Also

नितीन पाटील यांच्या रूपाने पनवेलला मिळणार पहिला आगरी समाजाचा महापौर

उपमहापौरपदासाठी प्रमिला पाटील यांचा अर्ज दाखल पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाकरिता होणार्‍या …

Leave a Reply