आजच्या मल्टीप्लेक्स युगातील जेन झी पिढीला हिंदी चित्रपटसृष्टीतील आशा सचदेव नावाची अभिनेत्री माहीत असण्याची शक्यता कमी आहे आणि आपण लक्षात रहावे, असावे अशीही लक्षवेधक कामगिरी जवळपास दीडशे चित्रपट आणि काही मालिकांमध्ये काम करुनही आशा सचदेवला साध्य करता आले नाही. असेही एखाद्या कलाकाराचे प्रगती पुस्तक असू शकते. कधी कधी एकूणच स्पर्धेत आपण टिच्चून टिकून राहण्यासाठी मिळेल ती भूमिका साकारत साकारत वाटचाल करावी लागते. आशा सचदेव
(जन्म २७ मे १९५६) नुकतीच सत्तर वर्षांची झाली आणि त्यातील पन्नास बावन्न वर्षे चित्रपटसृष्टीतील आहेत हे विशेष.
आशा सचदेव म्हणजे आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीसमोरची हिंदी चित्रपटसृष्टीतील जणू राशी खन्ना, तृप्ती डिमरी, सोनम बजवा अथवा तमन्ना भाटिया. कातिल अदा ही त्यांची जणू खासियत.
अभिनयाच्या वाटेला गेलो न गेलो तरी अडत नाही. घडत नाही. आधुनिक फॅशनच्या स्टाईलीश वस्त्रात आपल्या सौंदर्याचे आकर्षक दर्शन घडवणे या एका पासपोर्टवर रुपेरी पडद्यावर, गॉसिप्स मॅगझिनमधून, फिल्मी पार्टीतून, फिल्मी इव्हेंटसमधून ‘ दिसत ‘ राहणे हेच या वर्गातील अभिनेत्रींचे हुकमी काम. आज सोशल मीडियात त्यांना इन्फूअन्सर्स भरपूर स्कोप देतात, त्या विमानतळावर आल्या आल्या, गेल्या गेल्या, कुठे मॉलमध्ये असल्या की त्या बाहेर पडण्यापूर्वीच रिल पोस्ट करणे. इतकीच त्यांची झेप.
प्रत्येक दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत आशा सचदेव, पद्मिनी कपिला, शीतल, श्यामली, प्रेमा नारायण, जाहिरा वगैरे असतात आणि असल्या तरी त्या नसतात. त्याना पीन अप गर्ल, सेन्ट्रल पेज आयटेम गर्ल, शो बिझनेस गर्ल असेही म्हणतात. काही काळाने त्या पडद्याआड जातात, तशाच वैशिष्ट्यांच्या आणखी कोणी येतात आणि हे चक्र सुरू राहते. आणि यातील अनेक ‘उडत्या तबकड्या’ नक्की कुठे जातात, हरवतात हे समजत नाही.
आशा सचदेवही साधारण पंधरा वीस वर्षांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर आहे आणि तिला या चकाचक क्षेत्रापासून शक्य तितके लांब राहून आपलं आयुष्य जगणं जमलं आहे आणि याचे श्रेय तिला द्यायला हवे. जवळपास तीस वर्षे आपण ज्या क्षेत्रात वावरलो, दिग्दर्शकाकडून झालेले सायलेन्स…. लाइट्स, कॅमेरा, ॲक्शन असे म्हणणे ऐकले, ती सवय मोडणे सोपे नसते.
आशा सचदेव हिने पुणे येथील चित्रपट आणि दूरदर्शन अभिनय संस्था (फिल्म ॲन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया)
येथे अभिनय प्रशिक्षण घेतले. पण तेथे अभिनयाचा श्रीगणेशा केलेले सगळेच कलाकार जया भादुरी होत नाहीत, कोणी राधा सलुजाही होते. आशा सचदेव जया भादुरी, डॅनी डेन्झोपा, असरानी यांच्या नंतरच्या बॅचची. अभिनय प्रशिक्षण घेतले तरी प्रत्यक्षात चित्रपटसृष्टीत पाऊल टाकल्यावर कोणत्या बॅनरचे चित्रपट मिळताहेत, त्याचे स्वरुप काय आहे या गोष्टीही महत्त्वाच्या असतात. आशा सचदेवला जोगिंदर अभिनित व दिग्दर्शित ‘ बिदीया और बंदूक ‘(१९७२. नायक किरणकुमार) आणि कुकू कोहली दिग्दर्शित ” डबल क्रॉस ‘(१९७३) हे चित्रपट मिळाले. बिदीया और बंदूक हा तसा बी ग्रेड मसालेदार मनोरंजक चित्रपट. त्यात आशा सचदेवने दुर्गा ही ग्रामीण भागातील युवती साकारताना तिच्या अभिनयापेक्षा तिचं ओलेती रुप, तिचं धाडसी वावरणे याला स्कोप होता. डबल क्रॉस या चित्रपटात विजय आनंदची दुहेरी भूमिका. आणि अर्थातच दोन नायिका. रेखा आणि आशा सचदेव. दोन्ही ग्लॅमरस लूकमध्ये. बिदीया और बंदूक गल्ला पेटीवर यशस्वी ठरला, डबल क्रॉसला रसिकांनी नाकारले. आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला अशी यशापयशाची खेळी झाल्याने आशा सचदेवला चित्रपट निवडीसाठी वाव मिळाला नाही, जे आणि जसे चित्रपट आले, तसे ते स्वीकारावे लागले. आशा सचदेवने कारकीर्द सुरू केली तेव्हा अगोदरच्या पिढीतील शर्मिला टागोर, तनुजा, सायरा बानू कार्यरत होत्या, हेमा मालिनी, राखी, जया भादुरी, रेखा आघाडीवर होत्या. झीनत अमान, परवीन बॉबी या पाश्चात्य वळणाच्या अभिनेत्री लक्षवेधक ठरत होत्या. नीतू सिंग, रिना रॉय, मौशमी चटर्जी, योगिता बाली यांचा झंझावात सुरू झाला होता. वेगळ्या प्रवाहातील चित्रपटातून शबाना आझमी फोकसमध्ये होती. सुलक्षणा पंडित, विद्या सिन्हा , रेहाना सुल्तान, नाझनीन, जाहिरा अशा अनेक अभिनेत्री होत्याच. आशा सचदेवसमोर मोठेच आव्हान होते. राजेश खन्नाच्या झंझावातात ती आली पण त्याची ती नायिका होऊ शकत नव्हती. अमिताभ बच्चनचे युग संचारले, तेथेही आशा सचदेवला स्कोप नाही. अशा वेळी बी ग्रेड सिनेमांमध्ये काम करा किंवा ए ग्रेड सिनेमांमध्ये सहाय्यक भूमिका करा हाच पर्याय राहतो आणि उरलेली कसर गॉसिप्स मॅगझिनमधून बिनधास्त फोटो
सेशन करा.
आशा सचदेव या चौकटीत जणू अडकली. हाथी के दात (त्या काळात अवघ्या चार दिवसांत हा चित्रपट आमच्या गिरगावातील सेन्ट्रल थिएटरमधून उतरला. चित्रपट फ्लॉपचा रेकॉर्ड), हिफाजत, एक नारी दो रुप, कश्मकश, दो चट्टाने, दो नंबर के अमिर, एक ही रास्ता, एजण्ड विनोद, शाही लुटेरा, हमराही , आहुती, वो मै नहीं,भूख, ज्वाला डाकू, प्यार की मंजिल, सुहाग, मामा भाजा, हमसे ना जिता कोई, हसते खेलते, प्यार के काबिल, सत्ते पे सत्ता…. अशा अनेक चित्रपटांतून भूमिका केल्या. त्यातून एकच घडले, आशा सचदेव कार्यरत राहिली. अधिकचे काही गुण मिळाले असे काहीही घडलं नाही. एखाद्या
(खरंतर अनेक) कलाकाराची कारकीर्द अशीही असू शकते. एकामागोमाग एक चित्रपट मिळत जातात, वाटेला आलेली भूमिका साकारत जायचे इतकेच. सुरुवातच बी ग्रेड चित्रपटात काम करुन केल्याने पुढचं सगळं गणितच विस्कटले असा एक निष्कर्ष निघतो. पण आशा सचदेवकडे आकर्षक सौंदर्य, ते पडद्यावर आणि फोटो सेशनमध्ये मांडण्याचा धीटपणा याशिवाय काय होते? बासू चटर्जी दिग्दर्शित ‘ प्रियतमा ‘ या खेळकर खोडकर चित्रपटात तिला नीतू सिंगची मैत्रीण रेणू ही एक दिलखुलास भूमिका मिळाली आणि तिने चक्क चष्मा लावून ती भूमिका रंगवली, खुलवली. तिला त्या भूमिकेसाठी फिल्म फेअर पुरस्कार प्राप्त झाला.
तिने पडद्यावर अनेक गाण्यांवर काम केले.सत्ते पे सत्ता या चित्रपटातील मौसम मस्ताना या गाण्यात तीदेखील आहे.तरी दोन गाणी विशेष उल्लेखनीय, एक म्हणजे बी. आर. चोप्रा दिग्दर्शित ‘ द बर्निग ट्रेन ‘ मधील धावत्या ट्रेनमधील पल दो पल का साथ हमारा ही कव्वाली आणि राज कपूर दिग्दर्शित ‘ प्रेम रोग ‘ या चित्रपटातील यह प्यार था या कुछ और था हे गाणे. दोन मान्यवर दिग्दर्शकांचे तिला हे विशेष देणे. ही तिची खरी मिळकत.
कालांतराने आशा सचदेवची चित्रपटसृष्टीला फारशी गरज नव्हती जणू. कारण पुढील पिढीतील ग्लॅमरस लूक असलेल्या अभिनेत्री आल्या होत्या. आशा सचदेवने फिजा, आगाज, आजा नचले, झूम बराबर झूम अशा काही चित्रपटांत तसेच बुनियाद वगैरे काही मालिकांमध्ये काम केले. पण आता तिच्यासाठी यात फक्त आणि फक्त मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहोत हे दाखवून द्यायचे होते. नंतर त्याचीही तिला आवश्यकता वाटली नाही. आगाज या चित्रपटाच्या कमालिस्तान स्टुडिओतील सेटवर आशा सचदेवच्या मुलाखतीचा योग आला असता आपणास या क्षेत्रात टिकून राहण्यासाठी येईल तो चित्रपट स्वीकारणे हा एकच पर्याय होता आणि तो मी एन्जॉय केला, नायिकेच्या भूमिकेसाठी आश्वासनं अनेक मिळाली पण ती त्या चित्रपटाच्या घोषणेवरच राहिली असे तिने म्हटले. उद्योगपती किशनलाल यांच्याशी तिचा प्रेम विवाह नक्की झाला होता पण दुर्दैवाने त्यांचे अपघाती निधन झाले आणि आशा सचदेवने कधीच लग्न न करण्याचा निर्णय घेतला आणि तो कायम ठेवला.
आशा सचदेवचे मूळ नाव नफिसा सुल्तान. ती आशा सचदेव कशी झाली? अहमद अली खान हे तिचे वडील. त्यांना दोन मुली व एक मुलगा. पण साठच्या दशकाच्या सुरुवातीला त्यांचा घटस्फोट झाला तेव्हा मुलगा वडिलांकडे तर दोन्ही मुली आई रझियाकडे असा निर्णय घेतला गेला. आईने आता वकील आय. पी. सचदेव यांच्याशी लग्न केले आणि नफिसा सुल्तान हिचे नाव आशा सचदेव झाले. बहिणीचे नाव रेश्मा सचदेव झाले. तर यांच्या वडिलांनी दुसरं लग्न केले, त्यातील मुलगा अर्शद वारसी. तर आशा सचदेवचा भाऊ म्हणजे पार्श्वगायक अन्वर हुसेन अशी ही नात्यातील गोष्ट. आपली आई हिंदी चित्रपटातून लहान मोठ्या भूमिका साकारत आहे म्हणून आपणही चित्रपटात काम करावे अशी आशा सचदेवची इच्छा होती ती पूर्ण झाली इतकेच….
आशा सचदेवला राम केळकर यांनी आपल्या दिग्दर्शनातील ‘ प्यासी आँखें ‘(१९८४) या चित्रपटात वहिदा रेहमान, शबाना आझमी आणि अमोल पालेकर यांच्यासह संधी दिली. दुर्दैवाने हा चित्रपट बराच काळ निर्मितीवस्थेत रखडला. विशेष उल्लेखनीय गोष्ट हा चित्रपट राजा ठाकूर दिग्दर्शित ‘ एकटी ‘(१९६८) या मराठी चित्रपटाची रिमेक आहे. या चित्रपटाची पटकथा आणि संवाद राम केळकर यांनी लिहिलेले आहेत आणि या चित्रपटात सुलोचना, डॉ. काशिनाथ घाणेकर, इंदुमती पैगणकर, शरद तळवलकर, कुसुम देशपांडे इत्यादींच्या प्रमुख भूमिका आहेत. आशा सचदेवने फार पूर्वी शबाना आझमीसोबत आपली एकेकाळी चांगली मैत्री होती, पण आपण चित्रपटसृष्टीत शोभेच्या भूमिका साकारत असलेली अभिनेत्री म्हणून ओळखल्या जात असल्याने तिने आणि इतरांनीही आपली साथ सोडली आणि आपण ‘एकटी’ राहिलो, असं म्हटलं होतं.
- दिलीप ठाकूर (चित्रपट समीक्षक)
RamPrahar – The Panvel Daily Paper