लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन
पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय महिला टेबल टेनिसपटू स्वस्तिका घोष हिने आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा उल्लेखनीय कामगिरी करत देशाचा गौरव वाढवला आहे. ओवेरियन सिस्ट शस्त्रक्रियेनंतर तब्बल तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर तिने केलेले हे पुनरागमन अत्यंत प्रेरणादायी ठरले आहे.
संदीप घोष यांची कन्या आणि १९५०च्या दशकातील नामवंत फुटबॉलपटू स्व. निर्मल घोष यांची नात असलेल्या स्वस्तिकाने फ्रान्समध्ये झालेल्या डब्ल्यूटीटी फीडर हेनेबाँट स्पर्धेत शानदार पुनरागमन करत आपल्या जिद्दीचा आणि कौशल्याचा प्रत्यय दिला. या यशाबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्वस्तिकाचे अभिनंदन करून तिला पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. यावेळी तिचे वडील व प्रशिक्षक संदीप घोष, क्रीडा प्रशिक्षक विनोद नाईक आदी उपस्थित होते.
स्पर्धेतील महिला दुहेरी गटात स्वस्तिकाने भारताच्या तनिषा कोटेचा हिच्यासह जोडी जमवत रौप्यपदक पटकावले. अंतिम फेरीपूर्वी भारतीय जोडीने फ्रान्स आणि स्वित्झर्लंडच्या मजबूत जोड्यांचा प्रत्येकी ३-० अशा सरळ सेटमध्ये पराभव करत अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात त्यांना अनुभवी जपानी जोडीकडून पराभव स्वीकारावा लागला आणि रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
याआधी शस्त्रक्रियेपूर्वी स्वस्तिकाने लक्झेंबर्गच्या साराह दे नुट्टे हिच्यासोबत डब्ल्यूटीटी स्टार कंटेंडर चेन्नई २०२६ स्पर्धेच्या महिला दुहेरीत उपांत्य फेरी गाठली होती. महिला एकेरी गटातही स्वस्तिकाने उत्कृष्ट खेळ करत कांस्यपदक जिंकले. बाद फेरीत तिने जर्मनीच्या सोफिया हिचा ३-२, तर युआन हिचा ३-१ असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीत बेल्जियमच्या खेळाडूवर ३-१ अशी मात करत ती उपांत्य फेरीत पोहचली, मात्र सलग सामन्यांमुळे आलेल्या थकव्याचा परिणाम झाल्याने उपांत्य फेरीत तिला चायनीज तैपेईच्या बलाढ्य खेळाडूकडून पराभव पत्करावा लागला.
स्वस्तिकाने यावर्षी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही स्तरांवर सातत्यपूर्ण यश संपादन केले आहे. तिने भारतातील महिला क्रमवारीत दुसरे स्थान मिळवले असून पंचकुला राष्ट्रीय क्रमवारी स्पर्धेचे महिला एकेरी विजेतेपदही पटकावले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर तिने भारताचे प्रतिनिधित्व करत एशियन टेबल टेनिस चॅम्पियनशिप, आयटीटीएफ मिक्स्ड टीम वर्ल्डकप, एशियन कप तसेच विविध डब्ल्यूटीटी स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
फ्रान्समधील या स्पर्धेतील उत्कृष्ट प्रदर्शनामुळे तिच्या जागतिक क्रमवारीतही मोठी सुधारणा झाली असून ती आता जागतिक क्रमवारीत १३२व्या स्थानावर पोहचली आहे.
या उल्लेखनीय पुनरागमनानंतर स्वस्तिकाची २७ जुलै ते २ ऑगस्टदरम्यान नवी दिल्ली येथे होणाऱ्या कॉमनवेल्थ टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय महिला संघात निवड झाली आहे. शस्त्रक्रियेनंतर अवघ्या तीन महिन्यांत आंतरराष्ट्रीय स्तरावर दोन पदके जिंकत स्वस्तिकाने आपल्या जिद्द, मेहनत आणि चिकाटीचा उत्कृष्ट नमुना सादर केला आहे. तिचे हे यश देशातील युवा खेळाडूंना निश्चितच प्रेरणादायी ठरणारे असून आगामी काळात तिच्याकडून आणखी मोठ्या कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
यशामागे खारघरच्या रामशेठ ठाकूर महाविद्यालयाचा मोलाचा वाटा
भारतीय महिला टेबल टेनिसपटू स्वस्तिका घोष हिने आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करत भारताचे नाव उज्ज्वल केले आहे. ती सीकेटी महाविद्यालयात एमए (इंग्रजी) शाखेची विद्यार्थिनी असून, शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या संकल्पनेतून खारघर येथील रामशेठ ठाकूर महाविद्यालयात उभारण्यात आलेले हाय-परफॉर्मन्स टेबल टेनिस प्रॅक्टिस सेंटर हे स्वस्तिकाच्या यशातील महत्त्वाचे आधारस्थान ठरले आहे. या अत्याधुनिक सराव केंद्रात जागतिक दर्जाच्या सुविधा, आधुनिक टेबल टेनिस उपकरणे आणि उच्चस्तरीय प्रशिक्षणासाठी आवश्यक असलेले वातावरण उपलब्ध करून देण्यात आले आहे. या केंद्रात स्वस्तिका सातत्याने सराव करत असून तिच्या यशामागे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा पाठिंबा आणि तिचे वडील व प्रशिक्षक संदीप घोष यांचे मोलाचे मार्गदर्शन व अथक परिश्रम आहेत. त्यांच्या कुशल प्रशिक्षणामुळे स्वस्तिकाने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण यश मिळवले आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper