Breaking News

कर्जमाफीमुळे बळीराजाला मोठा दिलासा -मंत्री ॲड. आशिष शेलार

रायगड जिल्हा किसान मोर्चातर्फे पनवेलमध्ये कृतज्ञता मेळावा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानले आभार

पनवेल : रामप्रहर वृत्त
मातीची सेवा करणारा, निसर्गाचे रक्षण करणारा आणि देशाला अन्नधान्य पुरवणारा बळीराजा हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र व राज्य सरकार कटिबद्ध आहे. राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी, वीजबिल माफी तसेच विविध कृषी कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून मोठा दिलासा देण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे ऐतिहासिक निर्णय घेतले असून त्याबद्दल संपूर्ण शेतकरी समाज सरकारप्रती कृतज्ञ आहे, असे प्रतिपादन राज्याचे माहिती व तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे संपर्कमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी येथे केले.
राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महायुती सरकारचे अभिनंदन तसेच आभार मानण्यासाठी भाजप उत्तर रायगड जिल्हा किसान मोर्चाच्या वतीने मार्केट यार्ड येथे गुरुवारी (दि.२३) कृतज्ञता मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मंत्री ॲड. शेलार प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
या मेळाव्याला भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार विक्रांत पाटील, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, महापौर नितीन पाटील, रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, जिल्हा सरचिटणीस व पनवेल महापालिकेचे सभागृहनेते ॲड. प्रकाश बिनेदार, दीपके बेहेरे, पनवेल पंचायत समितीच्या रंजना वास्कर, उपसभापती भूपेंद्र पाटील, खालापूर पंचायत समिती सभापती कृष्णा पारंगे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष मयुरेश नेतकर, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सागर सांगडे यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या भाषणात मंत्री आशिष शेलार म्हणाले की, शेतकरी हा माती आईची सेवा करणारा खरा कर्मयोगी आहे. त्याच्या कष्टातून शेतात सोने पिकते आणि त्याच उत्पादनाच्या विक्रीतून तो आपल्या कुटुंबाचा वर्षभराचा उदरनिर्वाह करतो, मात्र दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपीट आणि इतर नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे अशा कठीण काळात शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे ही काळाची गरज आहे आणि हे लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण योजना सुरू केल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनानेही त्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळवून दिला आहे. या केवळ घोषणा नसून त्यांची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
पीएम-किसान सन्मान निधी, प्रधानमंत्री पीक विमा योजना, कृषी यांत्रिकीकरण, शेतीसाठी आवश्यक खते व साहित्याची उपलब्धता, बाजारपेठेचा विस्तार, सिंचन सुविधा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यांसारख्या विविध उपक्रमांमुळे शेतकरी अधिक सक्षम होत आहे. शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत पुढील पिढीसाठी शेती अधिक सुरक्षित, शाश्वत आणि फायदेशीर करण्याचे काम सरकार करत असल्याचे मंत्री ॲड. शेलार यांनी सांगितले. पूर्वी युरिया खरेदीसाठी शेतकऱ्यांना तासन्‌‍तास रांगेत उभे राहावे लागत होते, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देत खत वितरण व्यवस्था अधिक पारदर्शक आणि सुलभ केली. त्याचबरोबर शेतकऱ्यांना आवश्यक सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्यावर सरकारने विशेष भर दिला असल्याचे त्यांनी नमूद केले.
राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्याचा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या वीजबिल माफीचा निर्णयही मोठा दिलासा देणारा ठरला आहे. या निर्णयांमुळे लाखो शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी कमी झाल्या असून त्यांना नव्याने उभारी मिळाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि महायुती सरकारला जनतेचे आशीर्वाद लाभत असल्याचे मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले. यावेळी त्यांनी विधानसभेत सातत्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठविणारे भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या कार्याचे कौतुक करताना या लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी शेतकऱ्यांचे प्रश्न प्रभावीपणे विधानसभेत मांडले असून त्यांच्या कार्यातून शेतकऱ्यांविषयीची तळमळ आणि आस्था स्पष्टपणे दिसून येते, असे अधोरेखित केले.
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी भाषणात म्हटले की, आपल्या देशाचा शेतकरी हा केवळ अन्नदाता नाही, तर देशाच्या अर्थव्यवस्थेचा मजबूत पाया आहे. शेतकऱ्याच्या कष्टामुळे आपल्या प्रत्येकाच्या घरात अन्न पोहचते, मात्र अनेक वर्षे नैसर्गिक आपत्ती, उत्पादन खर्चातील वाढ, बाजारभावातील चढ-उतार आणि कर्जाच्या ओझ्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने या परिस्थितीची जाणीव ठेवून शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी सरसकट दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर केली. हा निर्णय लाखो शेतकरी कुटुंबांना नवसंजीवनी देणारा आहे. त्याचबरोबर वीजबिल माफी, पीक विमा, सिंचन सुविधा, कृषी यांत्रिकीकरण, बाजारपेठेचा विस्तार आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती अधिक सक्षम करण्याचे कामही शासनाने सातत्याने केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने ‘पीएम-किसान सन्मान निधी’, प्रधानमंत्री पीक विमा योजना, माती आरोग्य पत्रिका, ई-नाम, सूक्ष्म सिंचन, नैसर्गिक शेती आणि कृषी क्षेत्रातील डिजिटल परिवर्तन यांसारख्या अनेक योजनांद्वारे शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणले आहेत. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली होत असून शेतकरी आत्मनिर्भरकडे वाटचाल करत असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी नमूद केले तसेच अटल सेतू संपल्यावर टोलनाकाजवळील डोंगरावर शिवमुद्रा उभारण्याची मागणी आमदार महेश बालदी यांनी केली होती, त्याला मंत्री आशिष शेलार यांनी मान्यता दिली असल्याचेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी सांगितले.
या मेळाव्याचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी केले. ते म्हणाले की, आज आपण सर्वजण एका अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक प्रसंगाचे साक्षीदार आहोत. महाराष्ट्रातील लाखो शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा देणारा सरसकट दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने घेतला आहे. हा निर्णय केवळ आर्थिक मदत नसून शेतकऱ्यांच्या आत्मविश्वासाला नवी उभारी देणारा आहे. रायगड जिल्हा किसान मोर्चाच्या वतीने आयोजित या कृतज्ञता मेळाव्याचा उद्देश सरकारने शेतकरी हितासाठी घेतलेल्या निर्णयांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे तसेच शासनाच्या विविध कृषी कल्याणकारी योजनांची माहिती शेतकरी बांधवांपर्यंत पोहचवणे हा आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण योजना राबवल्या आहेत आणि आता कर्जमाफीसारखे ऐतिहासिक निर्णय यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडत आहेत, असेही त्यांनी सांगितले.
मेळाव्याच्या निमित्ताने उपस्थित शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतलेल्या कर्जमाफीच्या निर्णयाचे स्वागत करत सरकारप्रती कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक बेहेरे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार सागर सांगडे यांनी मानले.

Check Also

गुरूकुल प्रज्ञाशोध परीक्षेत ‌सीकेटी‌ विद्यालयाचे यश

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल ः रामप्रहर वृत्तकोल्हापूर येथील गुरूकुल एज्युकेशन सोसायटीच्या वतीने गुरूकुल …

Leave a Reply