भारतीय चित्रपटसृष्टीच्या वाटचालीतील काही दर्जेदार (क्लासिक) चित्रपट पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात आणि त्यात पुनर्प्रत्ययाचा आनंद मिळतो. त्यात एक चित्रपट रसिक म्हणून आपल्या वयाचा टप्पाही महत्वाचा. मी शालेय वयात त्या काळातील एकपडदा चित्रपटगृह अर्थात सिंगल स्क्रीन थिएटर्स अथवा मुंबई दूरदर्शनवर शनिवारी सायंकाळी मराठी अथवा रविवारी संध्याकाळी पाहिलेला हिंदी चित्रपट त्यानंतर विविध माध्यमांतून (व्हिडिओ, उपग्रह वाहिनी, डिजिटल माध्यम) पाहताना त्यातील बारकावे अधिक प्रमाणात समजून येतात. काही चित्रपट मी एखाद्या चित्रपट महोत्सवात सिंहावलोकन विभागात अथवा अन्य एखाद्या निमित्ताने पुन्हा एकदा पाहिले अथवा पाहतो.
चित्रपती व्ही शांताराम दिग्दर्शित ‘अमर भूपाळी होनाजी बाळा’ हा चित्रपट अलिकडेच आशियाई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरातील मिनी थिएटरमध्ये अद्ययावत तंत्रज्ञानात पाहिला. अर्थात पुन्हा एकदा पाहिला आणि आवडलाही. चित्रपट तारखेनुसार जुना असला तरी आता या मिनी थिएटरमध्ये साऊंड सिस्टीम आणि प्रोजेक्शन यातील आधुनिकीकरणात तो अधिकच प्रभावी वाटला. व्ही.शांताराम हे प्रभातमधून बाहेर पडले आणि १९४२ साली त्यांनी राजकमलची तुतारी फुंकली आणि आपली चित्रपट निर्मिती व दिग्दर्शन यांची यशस्वी वाटचाल सुरु ठेवली. राजकमल कलामंदिरची स्थापना केल्यावर मुंबईत आपला स्टुडिओ हवा म्हणून त्यांनी प्रयत्न केला आणि त्यांनी जे. बी. एच. वाडिया यांजकडून सेन्ट्रल स्टुडिओ विकत घेतला. १९४२ साली अडीच लाख रुपये ही प्रचंड मोठी रक्कम होती आणि त्याचा राजकमल कलामंदिर स्टुडिओ उभारला (चित्रपट पटकथाकार व पत्रकार वसंत साठे यांच्या “बखर सिनेमाची” या पुस्तकात हा अतिशय महत्वाचा संदर्भ आहे).
असो. चित्रपटाच्या इतिहासात डोकावताना काही चित्रपट वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे दिसून येते. राजकमल कलामंदिर निर्मित, चित्रपती व्ही शांताराम निर्मित, दिग्दर्शित आणि संकलित ‘अमर भूपाळी’
(कवी होनाजी बाळा) हा चित्रपट असाच. या चित्रपटामुळे ग्रामीण भागातील प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात येऊ लागला. हा चित्रपट २१ ऑगस्ट १९५१ रोजी सेन्सॉर संमत झाला आणि ८ सप्टेंबर १९५१ रोजी मुंबईत प्लाझा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या प्रदर्शनास पंचाहत्तर वर्षे पूर्ण होत आहेत.
हा चित्रपट कवी होनाजी बाळा यांच्या आयुष्यावर आधारित आहे. या चित्रपटाची कथा म्हणजे पेशवाई बुडाली त्या काळातील होनाजी आणि त्याचा मित्र याची कथा. विश्राम बेडेकर यांनी ही कथा व्ही. शांताराम यांना सुचवली आणि त्यांनी चिंतामण मराठे यांच्यासोबत या चित्रपटाची पटकथा लिहिली. मराठी रंगभूमीवरील गायक कलाकार पंडितराव नगरकर यांनी या चित्रपटात होनाजी बाळा ही व्यक्तिरेखा साकारली. आणि या चित्रपटाच्या यशाने त्यांना कलाकार म्हणून ओळख मिळवून दिली. अभिनेत्री संध्या यांचा हा पहिलाच चित्रपट. खरंतर या भूमिकेसाठी व्ही. शांताराम यांनी अभिनेत्री कुसुम देशपांडे यांच्या धाकट्या भगिनी रंजना यांचा विचार केला होता. या निवडीमागची एक गोष्ट आहे. व्ही. शांताराम यांनी या भूमिकेसाठी एखाद्या तरुण मुलीचा शोध सुरु केला होता. तेव्हा राजकमल कलामंदिर स्टुडिओचे मॅनेजर वासू देसाई यांच्या मित्राने एका मुलीचा लहानसा फोटो आणून दिला. हा फोटो तसा अस्पष्ट होता, पण तरीही व्ही. शांताराम यांना हा चेहरा बरा वाटला आणि त्यांनी लगेचच त्या मुलीला बोलावून घेण्यास सांगितले.
व्ही. शांताराम दुसऱ्या दिवशी ‘होनाजी बाळा’ची पटकथा वाचत असताना वासू देसाई त्यांच्या खोलीत आले आणि त्यांच्या पाठोपाठ एक सतरा अठरा वर्षाची चांगली उंच, सडपातळ, गोरी मुलगी आली. तिने आपल्या कपाळावर कुंकवाचा थोडा मोठा टिळा लावला होता आणि डोक्यावरुन पदर घेतला होता. त्यामुळे ती कोल्हापूर येथील एखाद्या उच्च मराठा समाजातील युवती असावी असे वाटावे. चेहऱ्यावर रंग रंगोटी नव्हती. तिचे डोळे चांगले मोठे होते आणि नजर तीक्ष्ण होती. त्यात जराही चंचलता नव्हती. तिच्यासोबत तिचे वडीलही होते. त्यांचे नाव श्रीधर देशमुख. फार पूर्वी ते मराठी रंगभूमीवरील श्रेष्ठ नट केशवराव भोसले यांच्या ललित कलादर्शमध्ये नट म्हणून काम करत होते. त्यांनी आपल्या या मुलीचं नाव ‘विजया’ असं सांगितलं. व्ही शांताराम यांनी या भेटीत या युवतीचे बोलणं, चालणं वगैरे वगैरे गोष्टी जाणून घेतल्या. आणि मग त्यानंतर त्यांचे संध्या असं नाव केले आणि एका गुणी अभिनेत्रीच्या कलाजीवनाचा प्रवास सुरू झाला. (त्या काळात विजया देसाई या नावाच्या एक अभिनेत्री कार्यरत होत्या, म्हणून व्ही. शांताराम यांनी विजया हे नाव बदलून संध्या असं नाव दिलं.)
या चित्रपटाची कथा आणि संवाद चि. य. मराठे यांचे आहेत. पटकथा विश्वास बेडेकर यांची आहे. छायाचित्रण जी. बाळकृष्ण यांचे, ध्वनिमुद्रण ए. के. परमार यांचे तर कला दिग्दर्शन पु. श्री. काळे यांचे आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण परेल येथील राजकमल कला मंदिर स्टुडिओत करण्यात आले. या चित्रपटाची वैशिष्ट्ये अनेक. या चित्रपटाची गीते शाहीर होनाजी बाळा आणि अमर शेख यांची आहेत आणि संगीत वसंत देसाई यांचे आहे. आणि वसंतराव देशपांडे आणि लता मंगेशकर यांनी ही गीते गायली आहेत. या चित्रपटात एकूण अकरा गाणी आहेत. सांगा मुकुंद कुणी हा पाहिला, लटपट लटपट तुझं चालणं ग, घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला, ही गाणी आजही लोकप्रिय आहेत. यावरुन या गाण्याचा सर्वोत्तम दर्जा अधोरेखित होतो. चित्रपती व्ही शांताराम यांना गीत संगीत नृत्याची उत्तम जाण असल्याचे त्यांच्या चित्रपटांतून नेहमीच दिसले. याशिवाय या चित्रपटात घडी घडी अरे मनमोहना, तुझ्या प्रीतीचे दुःख मला दाखवू नको, सुंदरा म्हणे दिलभरा, तू पाक सुरत कामिना, गोल तुझ्या शरीराचा डौल, नको दूर देशी जाऊ सजणा, तुझी माझी प्रीत एकदा कधी, फडफड फडकतो भगवा झेंडा गगनात या गाण्यांचा समावेश आहे. विशेष उल्लेखनीय गोष्ट, घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला, ही भूपाळी अनेक वर्षे मराठी माणसाच्या घरात सकाळी ऐकली जाई.
या चित्रपटात पंडितराव नगरकर, संध्या, ललिता पवार, भालचंद्र पेंढारकर, विश्वास, गुलाब, जयराजत, निंबाळकर, अमीना, बंडोपंत सोहोनी, एम.जॉर्ज, स्ट्रोक्स, चांदोरकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. १९५२ सालच्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाला पॅरीस येथे उत्कृष्ट ध्वनिमुद्रण विभागात सेंटर नॅशनल डी ला सिनेमाटोग्राफिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विशेष उल्लेखनीय गोष्ट, हा चित्रपट बंगाली भाषेत डब करून पश्चिम बंगालमध्ये प्रदर्शित करण्यात आला. व्ही. शांताराम हे आपल्या प्रत्येक चित्रपटातील गाणी कमालीची चांगली असावीत यासाठी अधिकाधिक प्रयत्नशील असत. त्यांच्या दिग्दर्शनातील ‘दो आखें बारह हाथ’, अमर भूपाळी होनाजी बाळा, झनक झनक पायल बाजे, ‘नवरंग,’ ‘गीत गाया पत्थरोने,’ ” डॉ. कोटणीस की अमर कहानी”, पिंजरा वगैरे अनेक चित्रपटांत ते आपण पाहिले. पुन्हा पुन्हा पाहतोय.
संध्याजी राजकमल कलामंदिरच्या हुकमी नायिका. त्या नृत्यात कमालीच्या तरबेज असल्याने आणि त्यांच्याकडे उत्तम अभिनय समज असल्याने त्यांनी आपली प्रत्येक भूमिका उत्तम वठवली. आजही यू ट्यूबवर यातील कोणतेही गाणे पाहा, त्यात नृत्य आणि दृश्य सौंदर्य दिसते. मी मिडियात आल्यावर जुन्या काळातील अनेक सिनेमावाल्यांना आपण निदान प्रत्यक्षात पहावे, जमल्यास भेटावे, शक्य असेल तर मुलाखत करावी असे मला कायमच वाटे आणि विजय आनंद, मनमोहन देसाई, राज खोसला, प्रकाश मेहरा, देव आनंद यांच्या भेटीने ते साध्यही झाले. व्ही. शांताराम, राज कपूर , दिलीप कुमार यांचे प्रत्यक्षात दर्शन घडले (सिनेपत्रकारितेने मला बरेच काही दिले, त्यात हे फारच मौल्यवान). राजकमल कलामंदिर (युथ विंग)च्या किरण शांताराम निर्मित व सचिन पिळगावकर दिग्दर्शित “अशी ही बनवाबनवी” या सर्वकालीन तरुण आणि सुपरहिट चित्रपटाचा रौप्य महोत्सवी सोहळा राजकमल कलामंदिर स्टुडिओत रंगला तर चित्रपटाने प्लाझा चित्रपटगृहात पन्नास आठवड्यांचा मुक्काम केल्यावरचा सुवर्ण महोत्सवी सोहळा जुहूतील एका पंचतारांकित हॉटेलमधील स्विमिंग पूल साईटवर रंगला तेव्हा व्ही. शांताराम आणि दिलीप कुमार प्रमुख पाहुणे होते. अतिशय आदर ठेवावा अशा या चित्रपटसृष्टीतील दोन महनीय व्यक्ती. त्यांना एकाच सोहळ्यात पाहणे, ऐकणे, अनुभवणे आणि डोळ्यात साठवून ठेवण्याचे भाग्य मला लाभलयं. व्ही.शांताराम यांच्याशी यावेळेस औपचारिक भेटही घेतली. पण मी बोलणार काय?
चित्रपती व्ही. शांताराम यांच्या प्रगती पुस्तकात अशा अनेक अगणित सकारात्मक गोष्टी आहेत. आजही राजकमल कलामंदिर स्टुडिओत पाऊल टाकताच व्ही. शांताराम (जन्म १८ नोव्हेंबर १९०१. मृत्यू ३० ऑक्टोबर १९९०) यांचे अस्तित्व नक्कीच जाणवते. चित्रपती डॉ. व्ही. शांताराम यांचे १२५वे जयंती वर्ष १८ नोव्हेंबर २०२५ रोजी सुरु झाले आहे. मुंबई व ठाणे येथील आशियाई चित्रपट महोत्सवात डॉ. व्ही. शांताराम यांच्या चित्रपटांचा विशेष विभाग होता. गोव्यात आयोजित भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात डॉ. व्ही. शांताराम निर्मित ‘डॉक्टर कोटनीस की अमर कहानी (१९४६)’ हा चित्रपट दाखवण्यात आला.
जुन्या काळातील अनेक चित्रपटांची वैशिष्ट्ये अनेक. चित्रपती व्ही. शांताराम दिग्दर्शित चित्रपट हे या माध्यम आणि व्यवसायात कारकीर्द घडवू इच्छिणाऱ्यांना तर अभ्यासच आहे. चित्रपटाचा विषय, त्याची दृश्य माध्यमातून मांडणी, त्यातील व्यक्तीरेखेनुसार निवडलेले कलाकार, चित्रपटाची श्रेयनामावली, चित्रपटाची कथा प्रवाही असेल असे गीत संगीत नृत्य, चित्रपटाचे पोस्टर, होर्डिंग्ज, इतकेच नव्हे तर मुख्य चित्रपटगृह या सर्वच बाबतीत चित्रपती व्ही. शांताराम यांचे चित्रपट एक वेगळेच स्कूल आहे. ‘अमर भूपाळी होनाजी बाळा’ त्याच परंपरेतील एक वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट. त्याच्या प्रदर्शनास पंचाहत्तर वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त हा फोकस.
-दिलीप ठाकूर, चित्रपट समीक्षक
RamPrahar – The Panvel Daily Paper