खोपोली : प्रतिनिधी
खालापूर तालुक्यातील बोरगाव सोंडेवाडी येथे वर्षापर्यटनासाठी आलेल्या एका पर्यटकाने त्याच्याकडील पिस्तुलातून हवेत गोळीबार केल्याचा प्रकार घडला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. या प्रकरणी त्या पर्यटकावर खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पिस्तूल जप्त करण्यात आले आहे.
बदलापूर येथे राहणारा अमित गुरुनाथ मोरे मित्रांसह सोंडेवाडी धबधब्यावर आला होता. अमितसोबत चौक वावर्ले गावातील त्याचा नातेवाईकही होता. अमित याने स्वतःजवळील परवानाधारक पिस्तूलमधून अचानक हवेत गोळीबार केला. त्यामुळे पर्यटकांमध्ये अंदाधुंदी माजली. घाबरलेल्या पर्यटकांनी पळ काढण्यास सुरुवात केली. पर्यटकांपैकी धनराज बडे (रा. अजिवली, पनवेल) यांनी अमितला याबाबत जाब विचारला असता अमित व त्याच्या साथीदाराने धनराजला जबर मारहाण केली.
अमित राणेविरोधात खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्याजवळील पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. त्याला नोटीस देऊन सोडण्यात आले. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
Check Also
छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा उभारणी व सुशोभीकरण समितीची बैठक
शिवसृष्टीच्या उभारणी कामाला लवकरच होणार सुरुवात पनवेल ः रामप्रहर वृत्तमुंबईतील शिवाजी पार्कच्या धर्तीवर उलवे नोडमध्ये …