Breaking News

पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य आणि अत्याधुनिक सोयीसुविधायुक्त महापौर निवासस्थानाचे लोकार्पण भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते गुरुवारी (दि.१०) झाले. यावेळी त्यांनी महापौर नितीन पाटील यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या सोहळ्यास भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार निरंजन डावखरे व आमदार योगेश सागर, चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, पनवेलचे महापौर नितीन पाटील, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख, मनपा आयुक्त मंगेश चितळे, उपमहापौर प्रमिला पाटील, सभागृह नेते प्रकाश बिनेदार, स्थायी समिती सभापती बबन मुकादम, माजी सभागृह नेते तथा नगरसेवक परेश ठाकूर, प्रभाग समिती सभापती रवींद्र भगत, मधु पाटील, रवींद्र जोशी, अजय बहिरा, आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, पनवेल महापालिकेने गेल्या १० वर्षात अनेक लहान मोठे प्रकल्प आणि विकासकामे साकारली आहेत. यामध्ये भव्य दिव्य महापौरांचे निवासस्थान खारघरमध्ये उभारले जाणे ही आनंदाची बाब आहे. पनवेल क्षेत्राचा विकास करण्यासाठी लोकप्रतिनिधी तसेच पनवेल महापालिकेचे अधिकारी सर्वंजण कटिबद्ध आहेत. महापौर निवासस्थान प्रकल्पासाठी तत्कालीन महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनीही मोलाची भूमिका बजावल्याचे सांगत महापालिकेच्या जडणघडणीमध्ये दिलेल्या योगदानाचे त्यांनी कौतुक केले.
महापौर नितीन पाटील यांनी या प्रकल्पामुळे समाधान व्यक्त करताना पनवेल महापालिकेचे एक-एक प्रकल्प मार्गी लागत असल्याचे सांगितले. ते म्हणाले, आज पनवेल महापालिका ड वर्गातील महापालिका असली, तरी भविष्यात एमएमआर क्षेत्रातील मुंबईनंतरची सर्वात मोठी महापालिका म्हणून नावारूपास येईल. लोकनेते दि.बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ, आंतरराष्ट्रीय दर्जाचे रेल्वेस्थानक आणि समृद्धी महामार्गाचे जंक्शन यामुळे पनवेल परिसराचा वेगाने विकास होणार आहे. येत्या दहा वर्षांत अत्यंत वेगाने विकसित होणारी महापालिका म्हणून पनवेलचा लौकिक निर्माण होईल, असा विश्वासही महापौर पाटील यांनी व्यक्त केला.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महापौर निवासस्थानाच्या वास्तुरचनेत योगदान देणारे वास्तुविशारद, कंत्राटदार तसेच वास्तुविशारद व नगरसेविका रूचिता लोंढे यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थितांचे आभार अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे यांनी मानले.

Check Also

समरसता संकल्प अभियानांतर्गत पनवेलमध्ये कार्यक्रम; विद्यार्थ्यांचा गौरव

संत रोहिदास महाराजांच्या कार्याला मान्यवरांकडून उजाळा पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाच्या वतीने संत रोहिदास …

Leave a Reply