Breaking News

श्रीगणेशोत्सव आणि मनोरंजनक्षेत्र यांच्या नात्याची गोष्ट

आजच्या श्रीगणेशोत्सवात हमखास दिसणारी फिल्मी गोष्ट म्हणजे मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक लहान मोठ्या सेलिब्रिटीजनी अनेक सार्वजनिक श्रीगणेशोत्सवांना भेटी देणे आणि श्रीगणेशाचे आशीर्वाद घेणे. अमिताभ बच्चनपासून एखाद्या मालिकेत काम करणाऱ्या नवोदित होतकरू कलाकारांना असं दर्शन घेणं एक प्रकारचा मानसिक, भावनिक आनंद देणारं. अभिनय क्षेत्रात काम करणाऱ्यांना ही गोष्ट चांगली पर्वणी असते.
सार्वजनिक श्रीगणेशोत्सव आणि मनोरंजन क्षेत्र यांचे नाते बहुस्तरीय आणि घट्ट आहे आणि मुंबईतच चित्रपटसृष्टी रुजली असल्याने ते साहजिकच आहे. चित्रपट, मालिका, वेबसिरीज यात पडद्यावर काय काय चाललंय त्यासह या क्षेत्रातील अशा अनेक गोष्टीही खूप महत्वाच्या असतात. याच श्रीगणेशोत्सवातील गर्दीतच वाट काढून नवीन चित्रपटाच्या पोस्टर्सचे अनावरणही केले जाते. चित्रपटाच्या पूर्वप्रसिद्धीचा तो एक महत्त्वाचा घटक झाला आहे. अगदी पहिल्या दिवसापासून असं पोस्टर प्रकाशन सुरू होतं. सार्वजनिक श्रीगणेशोत्सवाच्या प्रवेशद्वारावर आगामी चित्रपटाच्या पोस्टर्स, होर्डिंग्ज यांचा देखावा उभा करण्याची परंपरा खरंतर फार पूर्वीपासूनची आहे. अगदी सत्तरच्या दशकातही श्रीगणेशोत्सवात धर्मेंद्र, जितेंद्र, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन यांच्या अनेक चित्रपटांची अशी पोस्टर्स, होर्डिंग्ज दिसत.
जनसामान्य प्रेक्षकांपर्यंत आपला चित्रपट पोहचवण्याचा तो एक भाग आहे. चित्रपटाची प्रसिद्धी एक वैशिष्ट्यपूर्ण व्यापक गोष्ट असून त्यात एक महत्वाचा घटक श्रीगणेशोत्सवातील चित्रपट प्रसिद्धी आहे. याच परंपरेतील एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे श्रीगणेशोत्सवातील गल्ली चित्रपट. आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीला अथवा जेन झी आणि जेन अल्फा पिढीला गल्ली क्रिकेट माहित असेल, कारण आजही शहरातील लहान मोठ्या गल्लीत, मैदानावर रबरी वा टेनिस चेंडूवरील क्रिकेट खेळले जाते. देश-विदेशातील काही क्रिकेटर्सही अशा गल्ली क्रिकेटमध्ये क्षणभर सहभागी होतात याचे समाज माध्यमातून रिल पाहायला मिळते. त्याला भरभरुन लाईक्स मिळतात, अपेक्षेप्रमाणे काही चांगल्या तर काही वाह्यात कॉमेन्टस येतात. (असं करण्यात काय बरे आनंद मिळतो हे त्यांनाच ठाऊक. देव त्यांना सद्बुद्धी देवो.) मात्र “गल्ली चित्रपट” राहिलाय आठवणीपुरता. एक भन्नाट व भारी संस्कृती होती हो. खासकरून श्रीगणेशोत्सवाचा तो एक अविभाज्य भाग झाला होता.
आज आपल्या वयाची पन्नाशी, साठी ओलांडलेल्यांना चित्रपट रसिकांना फ्लॅशबॅकमध्ये जात आठवत असेल साठ सत्तरच्या दशकात मुंबई, ठाणे, वसई, विरार, डोंबिवलीतील श्रीगणेशोत्सवातील हुकमी मनोरंजन म्हणजे गल्ली चित्रपट. कुठे ताडपत्रीवर बसून तर कुठे खुर्चीची व्यवस्था. वा घरचीच खुर्ची वा टेबल घ्यायचे. कोणी चक्क वृत्तपत्राच्या कागदाचा त्यासाठी वापर करे. कसं का असेना पिक्चर बघायला मिळाला की पुरे. आपल्या देशातील चित्रपट संस्कृतीतील हीदेखील एक
रंजक गोष्ट.
श्रीगणेशोत्सव मंडळाच्या मंडपात वा बाहेर रस्त्यावर, मैदानावर मधोमध सोळा एमएमचा पडदा लावून “पिक्चर” दाखवला जाई. काही ठिकाणी प्रोजेक्शनच्या बाजूला महिला प्रेक्षक तर पडद्याच्या पलीकडे पुरुष प्रेक्षक. तिकडे चित्र उलटे दिसे तरी कोणाचीच हरकत नसे. पिक्चर एन्जॉय करायला मिळतोय ना, बस्स. मन भरुन आनंद होई. पलीकडून दिलीपकुमार, राज कपूर, देव आनंद, राजकुमार, सुनील दत्त, धर्मेंद्र, राजेश खन्ना हे डावरे दिसले तरी त्यांची अदाकारी उजवी असे. अमिताभ बच्चन उजव्या हाताने ढिश्यूम ढिश्यूम करताना दिसे. पब्लिक चिक्कार असे. खचाखच गर्दी असे आणि टाळ्या शिट्ट्या हंशा हमखास असे. ती संस्कृतीच मोकळी ढाकळी व वेगळी होती. अनेक ठिकाणी पडद्याच्या पलिकडचा प्रेक्षकांवर छत नसल्यास पावसाचा व्यत्यय आल्यावर हिरमोड होई. तरी पडद्यावरुन लक्ष हटत नसे. पिक्चर पाहायला आलोय हे भान महत्वाचे असे.
काही ठिकाणी पडद्याबाहेर दृश्य जाई. तरी विनातक्रार चित्रपट पाहणे सुरु राही. कुठे चाळीतील गॅलरीतून, ओटीवर, पायरीवर बसून पिक्चर एन्जॉय केले जात. रात्रीची आरती झाल्यावर दहानंतर हे पिक्चर सुरु होत आणि एकपर्यंत संपत. एका अधिकृत मध्यंतरसह आणखीन दोन अनधिकृत मध्यंतर असत. कारण एक रिळ संपल्यावर दुसरे तिळ लावावे लागे. त्या रिळाकडेही कुतुहलाने पाहिलं जाई. प्रोजेक्शनवाला दिवसभरात कुठे भेटलाच तर त्याच्याकडून आज कोणत्या गल्लीत कोणता पिक्चर आहे हे हमखास विचारले जाई. सत्तरच्या दशकात साधारण अडीचशे, तीनशे रुपयांत गल्लीतील एका चित्रपटाचे आयोजन होत असे. (पन्नास वर्षापूर्वी ही रक्कम खूपच मोठी होती. पालकांना विचारुन बघा. त्या काळात मध्यमवर्गीय कुटुंबात मासिक साडेसातशे रुपये पगार भारी वाटत असे.) वर्गणी देताना काही चित्रपटप्रेमी फुकाचा सल्ला देत, दादा कोंडकेंचे सोंगाड्या, एकटा जीव सदाशिव, पांडू हवालदार पिक्चर दाखवा, खूप जुन्या पिढीतील व पठडीतील चित्रपट रसिक सांगे, झनक झनक पायल बाजे, नवरंग, पिंजरा असे म्युझिकल सुपरहिट चित्रपट दाखवा.
अर्थात मतस्वातंत्र्य असल्याने ते वापरायला हवेच. काही श्रीगणेशोत्सवात मंडळे स्मरणिकेत कार्यक्रमात स्थानिक कार्यक्रम, वाद्यवृंद, नाटक यासह चित्रपटाच्या तारखा दिल्या जात. अनंत चतुर्थीच्या आदल्या संध्याकाळी महाआरती असल्यानेच त्या दिवशी हमखास एक चित्रपट दाखवणे निश्चित असे. कारण आरतीला उशीर झाला तरी चित्रपटासाठीच्या पूर्वतयारीला फारसा वेळ लागत नसे. आणि रात्री उशीरा पिक्चर संपल्यावर काही स्वयंसेवक मंडपातच झोपत. आपली चाळ वा गल्ली सोडून इतरत्र पिक्चर एन्जॉय करायला गेलेले इतक्या रात्रीही पाहिलेल्या पिक्चरवर गप्पा करत करत घरी येत, बरेचजण ओटीवर झोपत. दुसऱ्या दिवशी वाडीच्या नाक्यावर, मंडपात कोपऱ्यात रात्री एन्जॉय केलेल्या नि आजच्या रात्रीच्या वाद्यवृंद वा नाटकावर चर्चा होई. दहा दिवसाच्या श्रीगणेशोत्सवात जवळपास प्रत्येक मंडळात दोन हिंदी व एक मराठी चित्रपट असे दाखवले जात. कुठे फक्त आणि फक्त मराठी चित्रपट दाखवत. मराठी बाणा असाही होता.
मी गिरगावातील खोताची वाडीत लहानपणापासून ही गल्ली चित्रपट संस्कृती अनुभवत मोठा झालो. ते दिवसच वेगळे होते. शेजारच्या आंबेवाडीत हमखास आर. के. फिल्म बॅनरचा म्युझिकल सुपरहिट चित्रपट पाहायला मिळत असे. बरसात, श्री ४२०, जिस देश मे गंगा बहती है मी तेथेच पाहिले. रामचंद्र बिल्डिंगमध्ये एका वर्षी जीने की राह, पुढच्याच वर्षी वारीस, मग एका वर्षी खिलौना पाहिला. याच बिल्डिंगमध्ये जितेंद्र लहानाचा मोठा झाला याचे ज्ञान होते, तोच आपल्या या चाळीसाठी दरवर्षी एक चित्रपट भेट देतो हेदेखील समजले. आज या सुंदर भवन इमारतीचे नूतनीकरण करण्यात येत आहे आणि तरीही जितेंद्र आपल्या या जुन्या राहणीमानाला अजिबात विसरला नाही. श्रीगणेशाच्या पहिल्या दिवशी त्याच्याच शुभ हस्ते श्रीगणेश मूर्तीची पूजा करून स्थापना करण्यात येते. राजेश खन्ना मुळचा आमच्या गिरगावातील ठाकूरव्दार नाक्यावरील सरस्वती निवासचा रहिवासी. त्यामुळेच गिरगावातील प्रत्येक गल्लीत त्याचा एक पिक्चर दाखवायचाच असा अलिखित नियम होता. प्रेम प्रेम म्हणतात ते हेच असते.
आपल्या देशात १९८२ साली रंगीत दूरदर्शन व व्हिडिओ यांचे आगमन झाले आणि गल्ली चित्रपट संस्कृतीत आता बदल होत होत गेला. पडद्याची जागा व्हीसीआरने घेतली. एका दिवसाचे दहा रुपये भाडे अशा पध्दतीनुसार चित्रपटाची कॅसेट हाती आली. वातावरण बदलले. आजच प्रदर्शित झालेल्या नवीन चित्रपटाची कशी कोण जाणे पण संध्याकाळपर्यंत कॅसेट उपलब्ध होऊ लागली (ती चोरट्या मार्गाने येते म्हटले गेले पण चित्रपटसृष्टीने त्यावर काही कठोर कारवाई वा उपाययोजना केली का? फक्त चर्चा होत राहिली.) व्हिडिओ कॅसेट युगात मिथुन चक्रवर्तीच्या डिस्को डान्स व देमार घेमार मसालेदार मनोरंजक चित्रपटांना भारी मागणी व्हायची. कोणत्या हीरोचे मार्केट कुठे असेल काही सांगता येत नाही. एका रात्रीत मिथुनचे तीन पिक्चर व्हिडिओवर एन्जॉय केले जाऊ लागले आणि गल्ली चित्रपट संस्कृती “पडद्याआड” गेली. आज अनेक सेलेब्रिटीजच्या घरचा गणपती, त्याचे आगमन आणि विसर्जन या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. सलमान खानच्या घरचा गणपती विशेष उल्लेखनीय. सर्वधर्मसमभाव साधणारा. माधुरी दीक्षित, शिल्पा शेट्टी, सोनाली बेंद्रे यांच्या घरच्या गणपतीची पूजा प्रसारमाध्यमांतून दिसते. अनेक मराठी कलाकार आपल्या लहानपणीच्या श्रीगणेशोत्सवाच्या आठवणी सांगतात. पुणे शहरातील श्रीगणेशोत्सवात श्रुती मराठे, संस्कृती बालगुडे, तेजस्वीनी पंडित यांचे उत्साही ढोल वाजन विशेष उल्लेखनीय. त्यासाठी लागणारी क्षमता, सातत्य व आवड त्यांच्याकडे आहे. इन्स्टाग्रामवर अनेक सेलिब्रिटीजच्या श्रीगणेश दर्शन, पूजन यांच्या भरपूर पोस्ट पाहायला मिळतील. त्यात हौसमौज जास्त असेल. श्रीगणेशोत्सव मिरवणुकीत डीजे वादनाबद्दलही कलाकारांनी मते व्यक्त केली. हल्ली कोणत्याही गोष्टीवर मत व्यक्त करायचं तर ट्रोलर टपलेले असतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं हिताचं. त्यांना गणपती बुध्दी देवो. श्रीगणेशोत्सव आणि मनोरंजन क्षेत्र यांच्या नातेसंबंधांची गोष्ट बरीच मोठी आहे. मनोरंजन क्षेत्राचा हाही एक रंग आहे.
– दिलीप ठाकूर-चित्रपट समीक्षक

Check Also

पनवेल भाजपतर्फे घरगुती पर्यावरणपूरक गणपती सजावट स्पर्धा

२५ हजारांपर्यंतची आकर्षक पारितोषिके पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष पनवेलच्या वतीने आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर …

Leave a Reply