Breaking News

तू सुखकर्ता, तू दु:खहर्ता!

14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असलेल्या गणरायाचे आगमन घरोघरी तसेच सार्वजनिकरित्या झालेले आहे. यंदा गणेशोत्सवावर कोविड-19चे सावट आहे. असे असले तरी हा आनंददायी उत्सव साजरा करण्याचा उत्साह कायम आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या नकारात्मक वातावरणात काही दिवस का होईना चैतन्य अनुभवास मिळत आहे.

भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा पुत्र श्रीगणेशाला आद्यपूजेचा मान आहे. कोणतेही शुभकार्य करण्यापूर्वी गणपतीची पूजा-अर्चा केली जाते. गणराय हा बुद्धीदाता म्हणूनही ओळखला जातो. अशा या बाप्पाचा उत्सव महाराष्ट्रात दरवर्षी अत्यंत श्रद्धेने, मोठ्या भक्तिभावाने आणि हर्षोल्हासात साजरा केला जातो. दीड, पाच आणि 10 दिवसांसाठी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. केवळ महाराष्ट्रातच नव्हे; तर देशभरात आणि अगदी जगात जिथे जिथे गजाननाचे भक्त आहेत त्या ठिकाणी ते त्याची यानिमित्ताने विशेष आराधना करतात. यंदा संपूर्ण जग कोरोना महामारीने त्रस्त आहे. आपल्या देशातही कोविड-19चा प्रादुर्भाव झाला असून, महाराष्ट्र तर कोरोना रुग्णांमध्ये अव्वल आहे. अशा परिस्थितीत शासन-प्रशासन आपल्या परीने प्रयत्न करीत असून, पोलीस, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी ‘कोविड योद्धा’ बनून रात्रंदिवस कार्यरत आहेत. तरीही कोरोनाबाधितांचा आकडा सातत्याने वाढतच आहे. दुर्दैवाने काहींचा मृत्यूदेखील होत आहे. दिलासादायक बाब म्हणजे रुग्ण बरे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. गेल्या साडेचार महिन्यांपासून कोरोनामुळे सर्वत्र नकारात्मकता भरून राहिलेली आहे, परंतु गणरायाच्या आगमनाने वातावरणात उत्साह पहावयास मिळत आहे. या वर्षी गणेशोत्सव अटी, शर्थींचे पालन करून साजरा करावा लागत आहे. ते केलेचे पाहिजे, पण नियमांचे पालन करून गणेशोत्सव दणक्यातच साजरा व्हायला हवा. तो गणेशभक्तांचा अबाधित असा हक्क आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच आंतरजिल्हा एसटी प्रवासाला शासनाने परवानगी दिली आहे. सर्वसामान्य नागरिक याच ‘लाल’परीने प्रवास करीत असतात. इतके दिवस एसटी बंद असल्याने प्रवाशांचे हाल झाले, तर दुसरीकडे एसटी महामंडळालाही कोट्यवधींचे नुकसान सोसावे लागले. अखेर एसटी आता राज्यभर धावणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे, मात्र ही बससेवा आधी सुरू झाली असती, तर कोकणात गणेशोत्सवासाठी गेलेल्या चाकरमान्यांची परवड टळली असती. हा निर्णय यापूर्वी का घेतला गेला नाही, असा प्रश्न अनुत्तरित आहे. असो, बाप्पाचे आगमन झाले आहे. पाठोपाठ गौरीमाताही येईल. तेव्हा सारे घर कसे फुलून जाईल. माहेरवाशीणींसाठी गौराईचे आगमन सुखद असते. वर्षभर त्या तिची वाट पाहत असतात. ती आल्यावर काय करू नि काय नको असे त्यांना होऊन जाते. मंडळी गौरी-गणपतीचे येणे खरंच खूप आनंददायी असते. त्यांच्या येण्याने आबालवृद्ध सुखावतात. एरवी काम-धंद्यानिमित्त बाहेर असणारी लोकं गणेशोत्सवासाठी आवर्जून घरी येतात. मग ख्याली-खुशाली, विचारपूस होते आणि ताण-तणाव, थकवा काही क्षणांसाठी का होईना पण दूर होतो. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी स्वराज्यासाठी लोक एकत्र यावेत म्हणून गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. यंदा कोरोनामुळे एकत्र यायचे आहे, पण सुरक्षित अंतर राखून. कोरोनाच काय पण कोणताही आजार, व्याधी होऊ नये म्हणून स्वच्छता, व्यायाम, संतुलित आहार घेण्याबरोबरच काही गोष्टींचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. तसे केल्याने स्वत:सह आपल्या कुटुंबीयांचे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत होणार आहे.

Check Also

नितीन पाटील यांच्या रूपाने पनवेलला मिळणार पहिला आगरी समाजाचा महापौर

उपमहापौरपदासाठी प्रमिला पाटील यांचा अर्ज दाखल पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाकरिता होणार्‍या …

Leave a Reply