पनवेल ः रामप्रहर वृत्त
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त अल्पसंख्याक मोर्चा उत्तर रायगड जिल्ह्याच्या वतीने पनवेलच्या खांदा कॉलनीमध्ये रविवारी (दि. २०) रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमास रक्तदात्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला.
शिबिराला भाजप प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी आणि पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन पाटील यांनी भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले.
संपूर्ण कोकण प्रांतामध्ये रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली होती. खांदा कॉलनीतील रोटरी क्लब ऑफ न्यू पनवेल चॅरिटेबल ट्रस्ट संचलित लेट डॉ. बी.व्ही. लिमये ब्लड बँक येथे प्रदेश महामंत्री सय्यद अकबर आणि उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस इमरान शेख यांनी स्वतः रक्तदान करून शिबिरास प्रारंभ केला.
रक्तदान केल्यानंतर सय्यद अकबर म्हणाले की, रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. आमदार प्रशांत ठाकूर आदर्शस्थानी ठेवून मी कार्यरत असून रक्तदान शिबिराला मुस्लिम समाजाचा भरघोस पाठिंबा मिळतोय याचे मला अत्यंत समाधान आहे.
रक्तदान शिबिराच्या आयोजनासाठी अल्पसंख्याक मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष तथा उरणचे नगरसेवक जसिम गॅस, सरचिटणीस अमन अख्तर, इमरान शेख, उपाध्यक्ष इमरान खान, चिटणीस नासिर शेख, असिफ काझी यांनी परिश्रम घेतले. यावेळी ६६ बाटल्या रक्त संकलित करण्यात आले.
Check Also
पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य …
RamPrahar – The Panvel Daily Paper