पनवेल : रामप्रहर वृत्त
महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने पं. दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ २०२६चा शुभारंभ मंगळवारी (दि.२९) झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या रोजगार मेळाव्यांना पनवेलमध्येही तरुण-तरुणींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील आणि कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यतामंत्री मंगल प्रभात लोढा यांचा प्रमुख उपस्थितीत या राज्यव्यापी उपक्र्रमाचा मुंबईत शुभारंभ झाला. पनवेलमध्ये अंजुमन-ए-इस्लाम काळसेकर टेक्निकल कॅम्पस व अब्दुल रज्जाक काळसेकर पॉलिटेक्निक येथेही रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता.
या ठिकाणी आमदार प्रशांत ठाकूर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अंजुमन-ए-इस्लाम संस्थेचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. झहीर आय. काझी अध्यक्षस्थानी होते, तर सिनेट सदस्य मयुरेश नेतकर, मोहसिन वास्ता, श्रीकांत कोकाटे, संस्थेचे चेअरमन बुर्हान हॅरिस यांची प्रमुख उपस्थिती होती.
या रोजगार महाकुंभासाठी काळसेकर पॉलिटेक्निकमध्ये २,२४८ उमेदवारांनी नोंदणी केली होती, तर १,४०२ उमेदवार मुलाखतीस उपस्थित राहिले. नोंदणीकृत ७५ कंपन्यांपैकी ६४ कंपन्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. कॅस्ट्रॉल, हिंदुस्तान प्लॅटिनम, एशियन पेंट्स, अदानी एनर्जी, फोर्स मोटर्स, अल्केम, झेनो हेल्थ आदी नामांकित कंपन्यांनी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या तसेच २० सामंजस्य करार केले. विविध विभागांच्या समन्वयातून आयोजित हा रोजगार महाकुंभ तरुणाई आणि उद्योगविश्व यांना जोडणारे प्रभावी व्यासपीठ ठरला.
Check Also
परेश ठाकूर यांची महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड
पनवेलसह रायगडच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाची बाब पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनची (एमबीए) ८४वी चतुर्वार्षिक …
RamPrahar – The Panvel Daily Paper