Breaking News

पनवेलमधील झोपडपट्टीतील अनधिकृत दुकाने जमीनदोस्त ; वाहतूक कोंडी संपणार; रस्ते घेणार मोकळा श्वास

पनवेल ः प्रतिनिधी

पनवेल शहरातील इंदिरानगर, लक्ष्मी वसाहत, शिवाजीनगर या झोपडपट्टीत बेकायदेशीरपणे व्यवसाय करणार्‍या गाळ्यांवर आणि हॉटेल सुभाष पंजाबवर बुधवारी सकाळी पनवेल महानगरपालिकेने मोठ्या पोलीस बंदोबस्तात धडक कारवाई करून बेकायदेशीर बांधकामे जमीनदोस्त केली. त्यामुळे या भागातील रस्ते रुंदीकरणाचा प्रश्न सुटून वाहतूक कोंडी कमी होईल. पनवेल शहरातून मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग जातो. या महामार्गाच्या कडेला एसटी स्थानकाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात झोपड्या बांधण्यात आल्या आहेत. लक्ष्मी वसाहत, शिवाजीनगर आणि इंदिरानगरमध्ये झोपड्यांचा वापर व्यवसाय करण्यासाठी केला जात आहे. यामुळे वाहतुकीलाही अडथळा होत होता. लहान मुले रस्त्यावर धावत असल्याने लहान-मोठे अपघात होत असतात. या झोपडपट्टीत अनेकांच्या दोन-तीन झोपड्या असल्याचेही दिसून येते. एसटी स्थानकासमोर ट्रॅव्हल कंपनीची कार्यालये थाटल्याने रात्री तेथे खासगी वाहने उभी राहिल्याने वाहतूक कोंडी निर्माण होते, अशी सामान्य लोकांची तक्रार होती. त्यासाठी या झोपड्या पाडणे गरजेचे होते. एमएसआरडीसीने महामार्गाकरिता रस्त्याच्या मध्यापासून 23 मीटर अधिग्रहीत केलेल्या जागेवर अतिक्रमण केले म्हणून रस्ते विकास महामंडळाने मुंबई हायवे अ‍ॅक्ट 1955नुसार कलम 23प्रमाणे लोकसभा निवडणुकीपूर्वी झोपडपट्टीधारकांना नोटीसही दिल्या होत्या. 

    बुधवारी सकाळी 10.30 वाजता महापालिका आयुक्त गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रसाळ, उपायुक्त संध्या बावनकुळे, सहआयुक्त तेजस्विनी गलांडे आणि परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त अशोक दुधे आपल्या पोलीस फाट्यासह एसटी स्थानकासमोर आले. त्या ठिकाणी येणारे सर्व रस्ते बंद करण्यात येऊन वाहतूक वळवण्यात आली होती. तेथील हॉटेल सुभाष पंजाबसह ट्रॅव्हल एजंटची कार्यालये आणि झोपडपट्टीतील व्यावसायिक गाळे या वेळी पाडण्यात आले. या वेळी काही वेळ तणाव निर्माण झाला होता, पण पोलिसांनी परिस्थिती व्यवस्थित हाताळल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

– शहरातून जाणार्‍या महामार्गाच्या उड्डाणपुलाच्या कामात झोपडपट्टीचा अडथळा येत असून, इंदिरानगर, लक्ष्मी वसाहत, शिवाजीनगर या झोपडपट्टीतील अनधिकृत गाळे पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात येत आहेत. घरांचे पुनर्वसन झाल्यावरच घरांवर कारवाई होणार आहे.

 -गणेश देशमुख, आयुक्त पनवेल महापालिका

– पनवेलमधील इंदिरानगर, लक्ष्मी वसाहत, शिवाजीनगर झोपडपट्टीत बेकायदेशीरपणे व्यवसाय करणार्‍या गाळ्यांवर व हॉटेल सुभाष पंजाबवर कारवाई करून येथील बांधकामे जमीनदोस्त केल्याने महामार्गावरील रस्ते रुंदीकरणाचा प्रश्न सुटून वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. आज जे अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले, त्या ठिकाणी पुन्हा बांधकाम होऊ नये यासाठी उद्यापासून आम्ही रस्त्याच्या कामाला सुरुवात करणार आहोत. 

-संजय कटेकर, महापालिका अभियंता – अनेक झोपडपट्टीधारकांचा गोंधळ उडाला होता. आपल्या राहत्या झोपड्या पाडणार म्हणून अनेक जण तेथे चिंताग्रस्त चेहर्‍याने उभे होते. अनिता म्हात्रे यांचे वडील 50 वर्षांपूर्वी येथे राहायला आले. त्यांचा जन्मच येथील आहे. त्या आज आपला रोजगार बुडवून तेथे उभ्या होत्या. घरात उद्या बहिणीचे लग्न असून बाजारात जाऊन सामान खरेदी करण्याऐवजी त्या चिंताग्रस्तपणे फेर्‍या मारत होत्या, पण आज त्यांचे घर पडले नाही म्हणून त्यांनी देवाचे आभार मानले.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply