पनवेल : प्रतिनिधी
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. खांदा वसाहतीतील नगरसेविका सीता सदानंद पाटील यांनी आदिवासी विद्यार्थिनींचे वसतिगृह आणि बाजूच्या झोपडपट्टीत जाऊन आपले मार्गदर्शक आणि नेते यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. या वेळी या दोन्ही ठिकाणी उत्साहाला उधाण आले होते.
राजकारणापेक्षा समाजकारणी म्हणून ज्यांची ख्याती सर्वत्र आहे असे रायगडचे माजी खासदार रामशेठ ठाकूर एक दानशूर व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. गोरगरीब गरजूंचे ते आधार समजले जातात. रामशेठ ठाकूर आणि सामाजिक बांधिलकी, संवेदनशीलता, दयाळूपणा, कनवाळू स्वभाव व सर्वसामान्यांशी जोडलेली नाळ असे गेल्या तीन दशकांपेक्षा जास्त काळ समीकरण बनलेले आहे. पनवेल परिसरात सर्वसामान्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी प्रमाणात शैक्षणिक संकुल उभा करण्याचे काम माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी केले आहे. रयत शिक्षण संस्थेमार्फत शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करण्याचे दैवी काम ते करताहेत. हे करीत असताना सामाजिक बांधिलकी म्हणून वर्षभर विविध उपक्रम त्यांच्या मार्गदर्शनाखाली राबवले जातात. या समाजशील नेत्याचा वाढदिवस दरवर्षी 2 जून रोजी साजरा केला जातो. यंदा त्यांचा वाढदिवस खांदा वसाहतीतील आदिवासी विद्यार्थिनींच्या वसतिगृहात साजरा करण्याचा संकल्प स्थानिक नगरसेविका सीता पाटील यांनी केला होता. राज्यातील दुर्गम भागातून शिक्षणासाठी शहरात आलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबापासून केवळ शिक्षणासाठी दूर राहतात. अशा या सावित्रीच्या लेकींना बरोबर घेऊन माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचा केक सीताताई पाटील व सामाजिक कार्यकर्ते सुनील खाडे यांनी कापला. या वेळी वसतिगृहातील विद्यार्थिनींना केक भरविण्यात आला. यामुळे संबंधित मुलींच्या चेहर्यावर या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचा आनंद ओसंडून वाहताना दिसत होता.
नगरसेविका पाटील यांनी माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या कार्याची माहिती वसतिगृहातील विद्यार्थ्यांना दिली. त्याचबरोबर दिवा -पनवेल रेल्वे मार्गालगत असलेल्या झोपडपट्टीत जाऊन त्या ठिकाणच्या लहानग्या चिमुकल्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. अशाप्रकारे सामाजिक बांधिलकीच्या शिखरावर असलेले माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचा वाढदिवस नगरसेविका सीताताई सदानंद पाटील यांनी अनोख्या पद्धतीने साजरा केला.