Breaking News

आगीशी सामना

जीवन हे एका काचेच्या भांड्यासारखे आहे. कधी, कुठे अपघात वा घातपात होईल आणि क्षणात या जगाचा निरोप घ्यावा लागेल याची शाश्वती नाही. मग ते स्वतःच्या चुकीने असो वा कोणतीही चुकी नसताना केवळ दुसर्‍याच्या निष्काळजीपणामुळे नाहक निष्पापांचे बळी जात आहेत. मागील वर्षी पुण्यातील चौकात होर्डिंग सिग्नलवर उभ्या असणार्‍या वाहनांवर कोसळून चार जण मारले गेले. मारले गेले हा शब्द जाणीवपूर्वक वापरला आहे.

होर्डिंग लावणारे व त्याची देखभाल तसेच मोबदला वसूल करणारेच या निष्पापांचे मारेकरी आहेत. दोन दिवसांपूर्वी मुंबईच्या चर्चगेटजवळ मधुकर नार्वेकर (65) यांच्या डोक्यावर लोखंडी पत्रा पडून त्यामध्येच त्यांचा करुण अंत झाला. अशा अनेक घटनांमध्ये निष्पाप बळी ठरत आहेत. मुंबईत मागील वर्षी हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत 20 जण होरपळून दगावले होते, मात्र सुरत, गुजरातमधील घटना अगदी कीव यावी अशी आहे. घटनेचे कारण  किंवा घटना घडली त्या ठिकाणी अग्निशमन दलाची परवानगी होती की नाही किंवा आगीवर नियंत्रण मिळवणारी साधनसामुग्री होती का? या खोलात जायचे नाही, मात्र बचावकार्य करणारे एवढे बावळट असतील याची कल्पनाच न केलेली बरी. त्याहूनही परिसीमा ओलांडणारी घटना म्हणजे ज्यांनी बचाव कार्य करायचे ते अग्निशमन दल तब्बल पाऊण तास उशिराने घटनास्थळी दाखल झाले आणि तेही अपुर्‍या साधनसामुग्रीने. दलाकडे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठीची यंत्रसामुग्री अपुरी होती. अग्निशमन दलाच्या 18 गाड्या दिखावूपणासाठी दाखल  झाल्या. किमान 15 ते 20 मीटर उंचीची शिडी असणे आवश्यक होते. त्या शिडीवरून विद्यार्थ्यांना वाचवता आले असते किंवा कपड्याची जाळी अथवा नव्याने इमारत बांधताना लावण्यात येणारी तंगुसाची जाळी इमारतीच्या खाली लावली असती तर उड्या मारणार्‍या विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतले नसते. अग्निशमन दल व मदत करणार्‍या जमावाने बघ्याची भूमिका घेतल्यानेच 20 विद्यार्थ्यांना नाहक प्राणास मुकावे लागले. तक्षशीला कॉम्प्लेक्सच्या शेवटच्या मजल्याचे अवैध बांधकाम केल्याचा ठपका ठेवत सुरत पोलिसांनी या इमारतीचा विकासक हर्षल बेकरीया, जिग्नेश, कोचिंग सेंटरचा संचालक भार्गव भूटानी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

याउलट मुंबईचे अग्निशमन दलाचे कार्य देशात उच्च स्थानी आहे. अंधेरीच्या कामगार रुग्णालयात लागलेल्या आगीत 140 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात दलाला यश आले, तर आठ रुग्ण होरपळून ठार झाले. परळमधील हॉटेलातील अग्नितांडव तसेच 26/11चा आतंकी हल्ला, 11/7चा मुंबई उपनगरीय रेल्वे गाड्यांतील सात साखळी बॉम्बस्फोट अशा घटना मुंबई अग्निशमन दलाने मोठ्या जिद्दीने  हाताळल्या आहेत. 1 एप्रिल 1887 साली स्थापन झालेल्या मुंबई अग्निशमन दलाने नावाला साजेशे काम केले आहे.

मुंबई बॉम्बस्फोट बचावकार्य करताना अग्निशमन दलाचे 66 कर्मचारी शहीद झाले होते. त्यांच्या स्मरणार्थ 14 एप्रिल ते 21 एप्रिल अग्निशमन सप्ताह पाळण्यात येतो. मुंबईच्या धर्तीवर रायगडातील खोपोली अग्निशमन दलाला जिल्ह्यात विशेष स्थान आहे. अग्निशमन दलाला आपत्ती व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका बजवावी लागत असून आगीवर नियंत्रन करण्याबरोबरच कारखान्यातील वायुगळती, मार्गावर झालेली तेलगळती, जंगलात लागलेला वणवा, फार्महाऊसच्या आवारात लागलेली आग आदी निवारण्याची कामेही करावी लागतात. जिल्ह्यात कुठेही आग वा अप्रिय घटना घडली तर पहिला फोन लावला जातो तो खोपोली अग्निशमन दलाला. जिल्ह्यात

मोठमोठ्या औद्योगिक वसाहती, महामार्गांचे जाळे, अतिवेगवान, जलदगती मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग व सातत्याने घडणारे भीषण अपघात, नद्यांचे जाळे तसेच जिल्ह्याच्या उशाला असलेला समुद्रकिनारा, पावसाळ्यातील पर्यटनस्थळे, खोपोलीतील झेनिथ धबधबा,  बोरघाटातील धबधबे, पाताळगंगा नदीचा बारमाही प्रवाह, उल्हास नदीतील बुडण्याच्या घटना, माथेरानची दरी, जिल्ह्यातील गडकिल्ले व त्या ठिकाणी जाण्यासाठी ट्रेकिंगचे हौसी साहसी वीर, रेल्वेमार्ग व बोरघाटातील नेहमीचे अपघात या ठिकाणांच्या घटनांना प्रथम सामोरे जावे लागते ते खोपोली अग्निशमन दलाला. कधी भिवपुरी रेल्वे स्थानक व नेरळ स्थानकादरम्यान रेल्वेच्या इंजिनाला लागलेल्या आगीवरील नियंत्रणासाठी खोपोली अग्निशमन दलाला पाचारण केले जाते,  तर माथेरानच्या दरीत पर्यटक कोसळला तर खोपोली अग्निशमन दलाला फोन लावला जातो.

अतिवृष्टीने दरड कोसळणे ही तर खोपोली अग्निशमन दलाची पावसाळ्याच्या हंगामातील नित्याचीच बाब असते. बोरघाटात वाहनांच्या धडकेने गाडीतील इंधन किंवा ऑइल मार्गावर सांडल्यास रस्त्यावरील तेल धुवून काढण्यासाठी अग्निशमन दलाचा बंब जातो. खोपोली व खालापूर तसेच जिल्ह्यात कारखान्यात आग लागली तर खोपोली अग्निशमन दल पहिले हजर होते. खोपोलीतील सारसन येथील एप्रिल महिन्यात अलाना तेल कंपनीला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात दलाला यश आले होते. मंगलम कारखाना कुंभिवली, आशियन कलर कोट इस्पात, पारेख फूड, खोपोलीतील आय. सी. बार या कारखान्याला लागलेली आग, तर प्रसोल, प्राची कारखान्यात लागलेल्या आगीत दोन कामगार होरपळून दगावले, तर तीन भाजले होते. या आगीवर खोपोली अग्निशमनच्या जवानांनी नियंत्रण मिळविले होते. खालापुरात मागील दोन वर्षांत किमान 16 कारखान्यांना आग लागली. या ठिकाणी प्रथम पोहचत आगीशी झुंज खोपोली दलाने दिली आहे. बोरघाटात आडोशी बोगद्यात दरड कोसळली असता मदतकार्य करण्यास गेलेल्या अग्निशमन दलाचे जवान मोहन मोरे गंभीर जखमी झाले होते. खोपोलीत उंच उंच इमारती उभ्या राहत असताना तसेच सुरतमधील घटना ताजी असताना खोपोली अग्निशमन

दलाकडे कॅनव्हास सीट, नायलॉन जाळीची गरज लक्षात घेता खोपोली नगरपालिका मुख्याधिकारी गणेश शेटे यांनी जाळी विकत आणण्याचे आदेश दिल्याचे अग्निशमन दलाचे प्रमुख मोहन मोरे सांगतात, तर सुरत येथील दुर्दैवी घटना निव्वळ तेथील बचावकार्य करणार्‍या दलाच्या निष्काळजीपणामुळे घडली असून शिडी लावण्याची पद्धत, विद्यार्थ्यांची सुटका करण्याची पद्धत चुकीची झाल्याने मृतांचा आकडा वाढला असल्याचे मत मोहन मोरे मांडतात. खोपोली अग्निशमन दल अत्याधुनिकतेकडे वळत असून दलाकडे दोन अग्निशमन बंब, 15 मीटरच्या दोन शिड्या, फायर सूट, लाईफ जॅकेट, गॅस मास ग्लोज, आग प्रतिबंध विशिष्ट दर्जाचे गमबूट, पुराच्या पाण्यातून वाहून जाणार्‍या इसमाला वाचविण्यासाठी लाईफ जॅकेट अशा विविध साधनांनी युक्त खोपोली अग्निशमन दल सदैव तत्पर आहे आणि ही रायगड जिल्ह्यासाठी समाधानाची बाब आहे. दलाचे प्रमुख मोहन मोरे व त्यांचे साथीदार प्रशिक्षित असून, मोहन मोरे यांनी धाडसी बचावकार्य केल्याने त्यांना अनेक पदकांनी सन्मानित करण्यात आले आहे, तर उत्तम जलतरणपटू म्हणूनही मोरे यांचा लौकिक आहे.

-अरूण नलावडे, फिरस्ती

Check Also

राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा शुभारंभ

स्पर्धा प्रमुख परेश ठाकूर यांची जळगाव केंद्रावर उपस्थिती जळगाव ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर …

Leave a Reply