शत प्रतिशत भाजप या वाक्याचा प्रत्यय आज देशात, प्रत्येक राज्यात आणि प्रत्येक मतदारसंघात येत आहे. एकेकाळी लोकसभेत केवळ दोन खासदार असलेला भाजप पक्ष 2014 आणि 2019मध्ये एक मजबूत आणि सक्षम पक्ष म्हणून समोर आला आहे. दोनवरून 340 खासदार आणि जगात सर्वांत जास्त सदस्य असलेला भाजप हा एकमेव पक्ष ठरला आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या सक्षम आणि अभ्यासू नेतृत्वाखाली भाजप देशात यशस्वी घोडदौड करत असताना या धुळीचा काही भाग महाड विधानसभा मतदरसंघातही दिसू लागला आहे. महाड विधानसभा मतदारसंघात कमळ फुलण्यास पोषक वातावरण निर्माण होऊ लागले आहे.
महाड-पोलादपूर विधानसभा मतदारसंघाचे 2009 साली मतदार पुनर्रचनेत महाड, पोलादपूर, माणगाव विधानसभा मतदारसंघ अशी नव्याने रचना झाली. समाजवाद्यांचे प्राबल्य असलेल्या या मतदारसंघावर कै. शांतारामभाऊ फिलसे यांचा शिवसेनेचे प्रभाकर मोरे यांनी पराजय करून या मतदारसंघावरील समाजवाद्यांची मक्तेदारी मोडीत काढली व शिवसेनेचे प्राबल्य निर्माण केले. तीन वेळा प्रभाकर मोरे आमदार झाले. त्यानंतर दोन वेळा भरतशेठ गोगावले आमदार झाल्याने हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचे स्पष्ट होते. अपवाद केवळ 2004चा. माणिकराव जगताप हे राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले. 2004च्या या निवडणुकीत केवळ शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीच शिवसेनेच्या पराजयाला कारणीभूत ठरली होती. त्या वेळी महाड
मतदारसंघात भाजपचे संघटन होते, मात्र निवडणुका जिंकण्याएवढे ते सक्षम नव्हते, मात्र नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतात 2014च्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि महाड मतदारसंघाचे चित्र पालटू लागले. महाड मतदारसंघात भूमिपुत्र आमदार प्रवीण दरेकर यांचे सक्षम नेतृत्व आणि त्यांना जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची लाभलेली साथ यामुळे पक्ष संघटना मजबूत होऊ लागली. गावपातळी ते तालुका पातळीपर्यंत पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मजबूत साखळी निर्माण झाली आहे. पक्षाचा विचार आणि विकास तळागाळापर्यंत पोहचू लागला आहे. शिवसेना-मनसेचे काही नेते व पदाधिकारी भाजपच्या झेंड्याखाली गोळा होऊ लागले. पक्षात कार्यकर्त्यांचे संघटन वाढू लागले. एकेकाळी कोमात गेलेला हाच भाजप पक्ष ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायत निवडणुका लढवू लागला आणि काही प्रमाणात यशस्वीदेखील होऊ लागला. भाजपच्या या दमदार रिएण्ट्रीने मित्रपक्ष शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी या पक्षानी चांगलाच धसका घेतला. 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या उंबरठ्यावरच शिवसेनेतली गटबाजी पुन्हा डोके वर काढू लागली आहे. याचा प्रत्यय अनंत गीते यांच्या लोकसभा निवडणुकीत आला. भाजपने या निवडणुकीत मित्रपक्षाचे प्रामाणिक आणि निष्ठेने काम केले, मात्र गीते यांची सहा वेळा विजयी होण्याची परंपरा खंडित झाली. या पराभवाला शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीच कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.
महाड मतदारसंघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष लक्ष दिले आहे. 600 कोटी रायगड संवर्धनासाठी, रायगड परिघातील 21 गावांचा सर्वांगीण विकास, महाड रायगड मार्गाचे काँक्रीटीकरण आणि रुंदीकरण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मगाव आंबडवे ते महाड मार्गाचे राष्ट्रीय महामार्ग आणि रुंदीकरण, इंदापूर-निजामपूर पाचाड मार्ग, महाड करंजाडी लाटवण विसापूर मार्गाची पुनर्बांधणी, चवदार तळ्याचे सुशोभीकरण, गांधारी नदी पुनरुज्जीवन प्रकल्प अंतर्गत बंधार्याची कामे, जलयुक्त शिवार, रेकॉर्डब्रेक सावित्री पूल बांधला, झपाट्याने आणि गुणवत्तेत होणारे मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण या विकासकामांमुळे महाडमध्ये भाजपची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे.
भाजपची वाढणारी ताकद आणि मजबूत संघटन येत्या काळातील विधानसभा निवडणूकही लढवू शकते, असा विश्वास येथील भाजप कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कुशल आणि अभ्यासू नेतृत्वामुळे रायगड जिल्ह्यासह महाड मतदारसंघात विविध समित्या आणि जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून अनेक विकासकामांना चालना मिळाली आहे. या सर्व घटनांचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रभावाने आणि ज्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्रात एकही भ्रष्टाचार झाला नाही, असे संयमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वच्छ प्रतिमेने महाड मतदारसंघात पक्ष संघटन वाढू लागले. यातच भाजपच्या भविष्यातील विजयाची बिजे रुजली आहेत. भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर हे जिल्ह्यासह
महाडमध्येही पक्ष संघटना वाढविण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिले आहेत. ते कधीही, कुठेही आणि केव्हाही उपलब्ध असतात. हसतमुख चेहरा आणि साधे राहणीमान यामुळे कार्यकर्ते त्यांच्याकडे आकर्षिले जातात आणि त्यांचा हाच गुण रायगडमधील भाजप वाढण्यास संजीवनी ठरत आहे. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार प्रवीण दरेकर व आमदार प्रशांत ठाकूर महाड विधानसभा मतदारसंघ भविष्यात भाजपचा बालेकिल्ला करतील यात शंका नाही.
-महेंद्र शिंदे, महाड