रेवदंडा : प्रतिनिधी
दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय कामगार शिक्षण व विकास बोर्ड, प्रादेशिक संचलनालय -मुंबई आणि सोमजाई माता संस्था -म्हसळा यांच्या संयुक्त विद्यमाने मुरूड तालुक्यातील बोर्ली येथील प्राथमिक शाळेत नुकतेच असंघटीत (मासेमारी) कामगार प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले. त्यात कामगार शिक्षण अधिकारी रमेश मढवी यांनी मार्गदर्शन केले.
या दोन दिवसीय शिबिरात आरोग्य, व्यसनमुक्ती, बचत गट, अधंश्रध्दा निर्मुलन या विषयी तसेच केंद्र व राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली. ग्रामसभा व ग्रामस्थांचे अधिकारी तसेच शासकीय योजनांची माहिती या शिबीरातून प्राप्त झाली, असे शिबिरार्थी केदार नरहरी यांनी सांगितले.
ग्रामस्थांना शासकिय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन भाजप तालुका अध्यक्ष व मुरूड तालुका समन्वय समिती अध्यक्ष जयवंत अंबाजी यांनी दिले. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग प्रशिक्षक चंद्रकांत खोत यांनी शिबिरार्थींना योगासनांचे धडे दिले.
हे दोन दिवशीय असंघटीत कामगार प्रशिक्षण शिबिर यशस्वी करण्यासाठी भाजप मुरूड तालुका उपाध्यक्ष ब्रम्हानंद कमळ नाखवा, अलिबाग मुरूड विधानसभा मतदारसंघ सोशल मिडिया अध्यक्ष संदिप चिरायू, कार्यकर्ते प्रदिप नारायण कट यांनी विशेष परिश्रम घेतले.