मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेला न्याय देण्यासाठी प्रामाणिकपणे सकारात्मकतेने कार्य करून राज्याला विविध आघाड्यांवर देशात प्रथम क्रमांकावर नेण्याचा प्रयत्न केल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते मंगळवारी (दि. 2) अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना बोलत होते.
सर्वसमावेशकता आणि सकारात्मकता, प्रामाणिकता, पारदर्शीपणा या माध्यमातून वारीत सहभागी झाल्याची भावना मनात ठेवून राज्याचे विविध प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. विदर्भ-मराठवाडा अनुशेष, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णांना झालेली मदत, जलयुक्त शिवारसारखे महत्त्वाचे प्रकल्प, त्यासाठी मिळालेली जनतेची साथ, सिंचन प्रकल्प, वीज पंप वाटप अशा विविध बाबींचा मुख्यमंत्र्यांनी उल्लेख करून हे कार्य करीत असताना समाधान लाभल्याचे नमूद केले.
अंतिम आठवडा प्रस्तावातील मुद्द्यांवर मंत्री चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे-पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, सुभाष देशमुख, जयकुमार रावल, गिरीश महाजन, आशिष शेलार, डॉ. परिणय फुके यांनीही आपले विचार व्यक्त केले.
पावसाळी अधिवेशनात 26 विधेयके मंजूर
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहांत मिळून 26 विधेयके मंजूर झाली आहेत. एकूण 12 दिवस कामकाज झाले असून, त्याचा अवधी 100 तास 16 मिनिटे आहे. या अधिवेशनात 8 हजार 24 तारांकित प्रश्न प्राप्त झाले होते. त्यापैकी 711 स्वीकृत करण्यात आले, तर 53 प्रश्नांची चर्चा झाली. 80 पैकी 43 लक्षवेधींवर चर्चा झाली. अशासकीय विधेयके, 293 अन्वये चर्चा, अंतिम आठवडा प्रस्ताव आदींवरही चर्चा झाली.