मुंबई : प्रतिनिधी
मुंबई-गोवा महामार्गावरील अपूर्ण कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत तसेच या महामार्गावरील इंदापूर ते झारापदरम्यानच्या चौपदीकरणाचे काम जलदगतीने पूर्ण करावे. अपूर्ण कामे पूर्ण करून जनतेला तातडीने दिलासा द्यावा, असे निर्देश सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले.
मुंबई-गोवा महामार्गावरील कामासंदर्भात मंत्री रवींद्र चव्हाण यांनी गुरुवारी (दि. 5) सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग यांच्यासह संबंधित विभागाच्या अधिकार्यांसमवेत सविस्तर आढावा घेतला. या वेळी ना. चव्हाण यांनी पनवेल ते इंदापूर या मार्गावरील कासू ते इंदापूर टप्पा क्र.1, पनवेल ते कासू (वडखळजवळ) टप्पा क्र.2 आदींची सद्यस्थिती, या मार्गावरील दुरुस्तीचे काम, त्याचप्रमाणे इंदापूर ते झारापदरम्यानच्या बळकटीकरण व चौपदीकरण कामाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला आणि ही सर्व कामे तांत्रिकदृष्ट्या कशा पद्धतीने जलदगतीने पूर्ण करण्यात येतील याबाबत आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकार्यांना दिल्या.
या महामार्गावरील परशुराम घाट, कशेडी घाट आदी घाटरस्त्यांच्या लांबीतील उतारांचे स्थिरीकरण करून अपघातमुक्त करण्याबाबत तसेच हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासंदर्भात मंत्री चव्हाण यांनी सूचना दिल्या. या कामातील ज्या तांत्रिक व प्रशासकीय अडचणी असतील त्या दूर करण्याच्या दृष्टीने सर्वांनी तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
परशुराम घाटातील ग्रामस्थांचे स्थानांतरण करण्यासाठी दोन कोटी रुपये निधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग करण्यात आलेला आहे. तो तत्काळ संबंधितांना वितरीत करण्यात यावा, असेही मंत्री चव्हाण यांनी या वेळी सूचित केले.
Check Also
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेलमधील कानपोलीत विकासकामे
भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुभारंभ पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघात आमदार प्रशांत …
RamPrahar – The Panvel Daily Paper