विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आरोप
मुंबई ः प्रतिनिधी
राज्याच्या गृहविभागातील बदल्यांबाबतचा अहवाल उघड झाल्याच्या प्रकरणात रविवारी (दि. 13) पोलिसांनी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरी जाऊन त्यांची दोन तास चौकशी केली. या चौकशीचा भाजपकडून तीव्र निषेध करण्यात येत असून फडणवीस यांना आलेल्या नोटीसीची राज्यभर होळी करण्यात आली, तर या चौकशीनंतर फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत आपण अधिवेशनात सरकारचे घोटाळे उघड केल्यामुळेच आपल्याला चौकशीची नोटीस पाठवण्यात आल्याचा गंभीर आरोप केला. फडणवीस म्हणाले, राज्यात बदल्यांचा जो महाघोटाळा झाला त्याची सगळी माहिती मी केंद्रीय गृहसचिवांपर्यंत पोहचवली. त्यानंतर उच्च न्यायालयाने या घोटाळ्याची चौकशी सीबीआयला सोपवली. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. याचाच अर्थ हा महाघोटाळा घडला. हा घोटाळा का घडला याची चौकशी हे सरकार यासाठी करू शकत नाही, कारण महाघोटाळ्याचा अहवाल सहा महिने सरकारने दाबून ठेवला. मी जर तो बाहेर काढला नसता, तर कोट्यवधींचा घोटाळा दबून गेला असता. दाऊदसोबत सरकारच्या मंत्र्यांचे कनेक्शन किंवा विरोधी पक्षाबाबत सरकार करीत असलेले षडयंत्र हे विषय मी अधिवेशनादरम्यान सभागृहात मांडले. म्हणून अचानक अशी नोटीस मला देण्यात आली, असेही फडणवीस यांनी म्हटले. आपण जे केले ते गोपनीयता कायद्याचे उल्लंघन असेल, तर पहिली कारवाई नवाब मलिक यांच्यावरच व्हायला हवी. मी जबाबदार नेत्यासारखा वागलो. ट्रान्स्क्रिप्ट किंवा पेन ड्राईव्ह मी अन्य कुणालाही दिला नाही. राज्य सरकारनेच जो घोटाळा दाबला त्याचे कागदपत्र मी राज्य सरकारला दिले असते तर त्यांनी काय दिवे लावले असते. त्यामुळे मी हे कागदपत्र केंद्रीय गृहसचिवांना दिले. संवेदनशील माहिती मी सार्वजनिक केली नाही. गोपनीयतेचा भंग कुणी केला? संध्याकाळी ही सगळी कागदपत्रे नवाब मलिकांनी पत्रकारांना दिली. त्यांची चौकशी झाली पाहिजे. ही गोपनीय कागदपत्रे होती, तर ती पत्रकारांना देण्याचा नवाब मलिकांना अधिकार होता का, असा सवाल या वेळी फडणवीस यांनी उपस्थित केला.
पोलिसांच्या प्रश्नांवर आक्षेप
या वेळी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांनी त्यांना विचारलेल्या प्रश्नांवर आक्षेप नोंदवला. मला जी प्रश्नावली पाठवली होती आणि आज मला विचारण्यात आलेले प्रश्न यात गुणात्मक अंतर आहे. आजच्या सगळ्या प्रश्नांचा रोख गोपनीयता कायद्याचे उल्लंघन मीच केलेय असा होता. म्हणजे हा घोटाळा काढून या कायद्याचे उल्लंघन तुम्ही केलेय असे तुम्हाला वाटत नाही का? हे योग्य होते का? हे साक्षीदाराचा जबाब घेण्यासारखे प्रश्न नव्हते, पण पोलिसांचे प्रश्न मला सहआरोपी करता येईल का असे होते, अशा शब्दांत फडणवीस यांनी आक्षेप नोंदविला.