Breaking News

रत्नागिरीत धरण फुटले

13 जणांचा मृत्यू, 10 लोक बेपत्ता

रत्नागिरी : प्रतिनिधी

रत्नागिरीत झालेल्या अतिवृष्टीमुळे चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण मंगळवारी (दि. 2) रात्री फुटले. त्यामुळे पाणलोट क्षेत्रात पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊन 13 जणांचा मृत्यू झाला असून, 10 लोक बेपत्ता झाले आहेत. जिल्हा प्रशासनासह राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ) बचाव व शोधकार्य करीत आहेत.

कोकण आणि पश्चिम किनारपट्टीवर गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसाचा जोर इतका वाढला की तिवरे धरण फुटले. आलोरे-शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. धरण फुटल्याने जवळ असलेल्या बेंडवाडीवर काळाने घाला घातला असून, ओवळी, रिक्टोली, आकले, दादर, नांदिवसे, कळकवणे या गावांमध्ये पाणी घुसले, अशी माहिती रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली.

आतापर्यंत आत्माराम धोंडू चव्हाण (75), पांडुरंग धोंडू चव्हाण (55), दशरथ रवींद्र चव्हाण (20), चंद्रभागा कृष्णा चव्हाण (75), शारदा बळीराम चव्हाण (48), संदेश विश्वास धावडे (18) यांच्यासह 13 जणांचे मृतदेह हाती लागले असून, 10 जण अद्याप बेपत्ता आहेत.

दरम्यान, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि परिस्थितीचा आढावा घेतला.

तिवरे परिसरातील मदतकार्याचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे येथे मंगळवारी रात्री धरण फुटल्यामुळे सात जण ठार, तर 21 जण बेपत्ता आहेत. मृतांबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हळहळ व्यक्त केली असून मदतकार्याचा आढावा त्यांनी घेतला आहे. या प्रकरणासाठी जबाबदार असणार्‍यांविरोधात कारवाई करू, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.

तिवरे धरणाला तडे गेल्याबाबत नागरिकांनी तक्रार केली होती. गळती लागली असतानाही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले, तर अधिकार्‍यांनी दुरुस्ती केली होती, असा दावा केला आहे. त्यामुळे या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कडक कारवाई केली जाईल.

-गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply