पेण : प्रतिनिधी
मागील 40 वर्षे पेणमध्ये शेकापचा आमदार आहे, मात्र त्यांनी तालुक्याचा विकास न करता येथील जनतेची फक्त फसवणूक केली आहे, मात्र सर्वांना सर्वकाळ फसवता येत नाही, हे शेकाप नेत्यांनी लक्षात ठेवावे, अशी टीका माजी मंत्री तथा भाजप नेते रविशेठ पाटील यांनी येथे केली. पेणमधील आगरी समाज हॉलमध्ये झालेल्या भाजपच्या बैठकीत रविशेठ पाटील बोलत होते. पेण तालुक्याचा खर्या अर्थाने विकास करायचा असेल, तर भाजपशिवाय पर्याय नाही, असे त्यांनी या वेळी सांगितले. रविशेठ पाटील पुढे म्हणाले की, पेण विधानसभा मतदारसंघात मागील 40 वर्षांपासून शेकापची सत्ता आहे. पेण पंचायत समितीमध्ये, रायगड जिल्हा परिषदेमध्ये शेकाप सत्तेत आहे, मात्र या सत्तेचा उपयोग जनतेसाठी कधीही झाला नाही. स्वतःचे व कार्यकर्त्यांचे खिसे भरण्याची कामे शेकाप पुढार्यांनी केली आहेत. जनतेने नेहमी शेकापला साथ दिली, मात्र येथील जनतेच्या वाट्याला काय आले? तरुणांच्या हाताला काम नाही. आदिवासी समाजालादेखील विकासाच्या नावाने अनेक वेळा फसवण्यात आले आहे. आता आपल्याला विकासकामे करायची आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आता कंबर कसून कामाला लागावे आणि जनतेनेही भाजपला साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी या वेळी केले. मुख्यमंत्री 1 ऑगस्टपासून जनादेश यात्रेची सुरुवात करणार आहेत. राज्यातील 151 विधानसभा मतदारसंघांत ही जनादेश यात्रा फिरणार असून, ती 30 ऑगस्ट रोजी दुपारी 3.30 वाजता महाड येथे येणार आहे, तर संध्याकाळी 7 वाजता पेण येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रवक्ते मिलिंद पाटील यांनी या वेळी केले. भाजप जिल्हा चिटणीस बंडू खंडागळे, पेण तालुकाध्यक्ष गंगाधर पाटील, वैकुंठ पाटील, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील, अनंता पाटील, वंदना म्हात्रे, प्रचिता पाटील, हिमांशू कोठारी, अविनाश पाटील, व्ही. बी. पाटील, संजय घरत, तरणखोप सरपंच अभिजित पाटील यांसह कार्यकर्ते बैठकीस उपस्थित होते.