Breaking News

बालभारतीचे अभिनंदन

पहिली-दुसरीच्या इयत्तांची किंवा एकंदरच शालेय पुस्तके ही त्या-त्या पिढीच्या मानसिकतेवर दीर्घकाळ टिकणारे संस्कार करीत असतात. शालेय वयात पाठ्यपुस्तकातून समोर येणारी माहिती व विधाने मुले प्रमाण वाक्याच्या स्वरुपात स्वीकारत असतात. त्याचा प्रतिवाद फारच क्वचित केला जातो. त्यामुळेच लिंगभेदाच्या सामाजिक वैचारिक धारणेच्या स्वरुपात दूरगामी बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने बालभारतीने उचललेले पाऊल खूपच महत्त्वाचे ठरते.

बालभारतीची पुस्तके अनेक संदर्भात पुन्हा चर्चेत आहेत. सर्वसाधारणपणे शैक्षणिक वर्षाच्या सुरूवातीला अशी चर्चा होतेच. यंदा त्यात ‘अकरावीचा अभ्यासक्रम बदलल्याने नव्या पुस्तकांच्या छपाईला विलंब’, ‘दुसरीच्या पुस्तकातील संख्यावाचनाच्या नव्या पद्धतीला विरोध’पासून ‘बालभारतीच्या पुस्तकातील लिंगभेद चित्र बदलले’पर्यंत बातम्यांचे वैविध्य आहे. यातील संख्यावाचनाच्या नव्या पद्धतीला होणार्‍या विरोधाचे पडसाद तर थेट विधानसभेतही उमटले. अभ्यासक्रमातील बदलांची चर्चा ही व्हायलाच हवी. परंतु ही चर्चा बदल करण्याअगोदर होणे अधिक उचित ठरेल. तसेच ही चर्चा संबंधित विषयांच्या तज्ज्ञांमध्ये झाल्यास ते बदलांच्या दृष्टीने हिताचे व पोषक ठरेल. इयत्ता दुसरीच्या पुस्तकात संख्यावाचनाच्या पद्धतीत सुचवण्यात आलेला बदल हा जुन्या पद्धतीने गणित शिकलेल्या पिढीतील लोकांना खटकणारा असला तरी तो लहान मुलांसाठी गणिताचे सुलभीकरण करणारा आहे. या बदलाचे दूरगामी परिणाम काय, यासंदर्भात गणित विषयातील तज्ज्ञांनी चर्चा केलेली बरी. अकारण त्याला राजकीय वळण देऊन वादंग माजवणे म्हणजे बदलांना विरोध करून सारे काही ‘जैसे थे’ ठेवण्याचे समर्थन करणारे होईल. बदल नेहमीच वाईट असतात असे नाही. उदाहरणार्थ यंदा बालभारतीने पुस्तकातील लिंगभेदाचे चित्र बदलण्यासाठी घेतलेला पुढाकार हा निश्चितच स्वागतार्ह आणि अभिनंदनीय आहे. यापूर्वीच्या पाठ्यपुस्तकातून कायमच अभावितपणे पुरुषी मक्तेदारी ठसविणारी चित्रे वापरली गेली आहेत. अर्थातच पाठ्यपुस्तके ही त्या-त्या काळातील सामाजिक, वैचारिक मानसिकतेचे प्रतिनिधित्व करीत असतात. त्यामुळेच विसाव्या शतकातील पाठ्यपुस्तकांतून आपल्याला कायमच आई स्वैपाकघरात काम करताना दिसली तर बाबा वर्तमानपत्र वाचताना दिसले. आता मात्र बालभारतीने ही चित्रे बदलण्याचे पाऊल उचलले आहे आणि त्याकरिता बालभारतीचे आणि ही पुस्तके साकारणार्‍यांचे निश्चितच अभिनंदन करायला हवे. स्त्री-पुरुष समानतेला अशातर्‍हेने केंद्रस्थानी ठेवून पाठ्यपुस्तकांची आखणी करण्याचा विचार हा निश्चितच दूरगामी परिणाम करणारा ठरेल. हा कालसुसंगत बदल केल्याबद्दल बालभारतीचे कौतुक करायला मात्र आपले विधानसभेतील विरोधक पुढे सरसावले नाहीत. नव्या पुस्तकांत स्त्री आणि पुरुष एकत्रितपणे भाजी चिरत असल्याचे, किंवा महिला डॉक्टर पुरुष रुग्णाची तपासणी करीत असल्याचे तसेच महिला वाहतूक पोलिस वाहतुकीचे नियमन करीत असल्याचे दाखवण्यात आले आहे. ही नवी चित्रे स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देतात. विशेष म्हणजे या बदलांची दखल घेऊन शिक्षकांनी समाजातील त्या संदर्भातील बदलांची चर्चा वर्गात करावी अशी सूचनाही शिक्षकांकरिता पाठ्यपुस्तकाच्या प्रारंभी करण्यात आली आहे. या प्रगतीशील बदलांची चर्चाही आपल्या विधानसभेत अवश्य व्हावी. तरच लोकशाहीतील जबाबदार विरोधकांची भूमिका विरोधी पक्ष पार पाडत आहेत असे म्हणता येईल.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply