Breaking News

अतिवृष्टीचे सहा बळी ; रायगडात पावसाचा जोर ओसरला

अलिबाग ः प्रतिनिधी

दोन दिवस रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले. यात सहा जणांचा बळी गेला. सहाही जणांचे मृतदेह सापडले आहेत. जून महिन्यापासून नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांचा शोध सुरू आहे. रविवारी (दि. 28) पावासाचा जोरही कमी झाला. पूरही ओसरला. त्यामुळे रायगडकरांना काहीसा दिलासा मिळाला. रायगडचे जनजीवन पूर्वपदावर येत आहे. 

जिल्ह्यास दोन दिवस मुसळधार पावसाने झोडपून काढल्यामुळे सावित्री, कुंडलिका, पाताळगंगा, उल्हास, गाढी, भोगावती आणि घोड नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली होती. यामुळे पनवेल, महाड, रोहा, नागोठणे, सुधागड पाली, नेरळ तसेच पेण तालुक्यातील काही भागांत पूरस्थिती निर्माण झाली होती.

माथेरानमधील जामा मशीदसमोरच्या गटारात पडून युवराज वालेंद्र वाहून गेला होता. कर्जत येथील दहिगाव इंजिवली येथील विवेक भालेराव हा 18 वर्षीय तरुण सायंकाळी नाला ओलांडत असताना पाण्याचा अंदाज आला नसल्याने वाहून गेला. पोलादपूर तालुक्यात कुडपण येथे राजेंद्र शेलार हा नदीच्या प्रवाहात वाहून गेला. पनवेल तालुक्यातील उसर्ली येथे चेतन मोरे या 30 वर्षीय युवकाचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. रोहा तालुक्यातील नागोठणे येथे परशुराम विचारे यांचा तलावात बुडून मृत्यू झाला. अलिबाग तालुक्यातील बागमळा येथील छोटा खाडीपूल (उघडी) पाण्यात शनिवारी (दि. 27) दुपारी दोन वाजता मित्रांसमवेत चौलमळा येथील 19 वर्षीय युवक यश म्हात्रे मासेमारीसाठी गेला होता.

तेथे मित्रांसमवेत मासेमारी करीत असताना अचानक त्याचा पाय घसरून पडून खाडीपुलाच्या पाण्यात पडून बेपत्ता झाला होता. अखेर थेरोंडा डोर्‍याचीवाडी खाडीकिनारी त्यांचा मृतदेह सापडला. घटनास्थळी अलिबाग प्रांत अधिकारी शारदा पोवार, अलिबाग तहसीलदार सचिन शेजाळ, सुरेंद्र म्हात्रे, पोलीस निरीक्षक सुनील जैतापूरकर आदी उपस्थित होते.

माणगाव खुर्द आदिवासीवाडीतील घर जमीनदोस्त

पाली ः प्रतिनिधी

सुधागड तालुक्यासह जिल्ह्याला सलग पाच दिवसापासून मुसळधार पावसाने झोडपले आहे. अनेक ठिकाणी सोसाट्याच्या वारा व मुसळधार पावसात घरांची पडझड होऊन मोठे नुकसान झाले आहे. सुधागड तालुक्यातील माणगाव खुर्द आदिवासीवाडीतील झांजू हिलम यांचे राहते घर शनिवारी दि. (27) मध्यरात्री अतिवृष्टीत कोसळले. धुवाँधार पाऊस व कीर्र काळोख अशातच प्रसंगावधानता राखत पळ काढल्याने हिलंम बालबाल बचावले.

हलंम यांच्या कुटुंबातील सदस्य उदरनिर्वाहासाठी स्थलांतरित झाले आहेत. त्यामुळे जीवितहानी झाली नाही.

मात्र घराचे मोठे नुकसान झाले आहे. घरातील अन्नधान्य, कपडे तसेच भांडी व जीवनावश्यक वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे.

फार्ममध्ये अडकलेल्या 6जणांची सुखरुप सुटका

कर्जत ः कर्जत तालुक्यातील मानिवली ग्रामपंचायतमधील मोहिली येथे मीरा फार्ममध्ये सहा जण अडकले होते. त्यांना स्थानिक ग्रामस्थांनी पोलिसांच्या मदतीने रात्री उशीरा सुखरूप बाहेर काढले. या फार्ममध्ये दोन मुले, एक महिला आणि तीन पुरुष राहत होते. शुक्रवारी रात्रीपासून त्या टेकडीवर असलेल्या फार्म हाऊसला पाण्याने वेढा दिल्याने ते अडकले होते. सरपंच प्रवीण पाटील व ग्रामस्थांनी त्यांना बाहेर काढले.

Check Also

पनवेल-उरणच्या पाणी प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक

आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांचा पाठपुरावा मुंबई : रामप्रहर वृत्तसिडकोमार्फत पनवेल व …

Leave a Reply