उन्हाच्या तडाख्यामुळे मागणीत वाढ
पेण : प्रतिनिधी
रणरणत्या ऊन्हात थंडगार, रशरशीत आणि सर्वसामान्यांना परवडणारे फळ म्हणजे कलिंगड. वाढत्या उष्म्यामुळे कलिंगडाला मोठी मागणी असून ती पेणमधील शेतकरी पूर्ण करताना दिसत आहेत.
पेणमध्ये भातशेतीची कामे उरकल्यानंतर शेतकरी भाजीपाला, वाल व अन्य पिकांबरोबर जोडधंदा म्हणून कलिंगडाचेही उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतात. तालुक्यातील तरणखोप, बळवली, इरवाडी, हमरापूर, तांबडशेत, जोहे, वरेडी, गोविर्ले, जिते, खरोशी, दुरशेत, काश्मिरे व अन्य गावांतील अनेक शेतकरी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाशिवाय विक्रमी पीक घेऊन लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल करीत असतात. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाच्या झळा सुरू झाल्याने रसाळ व लालभडक रंगाच्या कलिंगडांनी पेणची बाजारपेठ फुलून गेली असल्याचे पाहायला मिळत आहे.
पेण तालुक्यातील शेतकरी अतिशय कष्टाळू असल्याने भातझोडणी झाल्यानंतर आपल्या कुटुंबासह घरदार सोडून दोन-तीन महिन्यांसाठी रोहा, माणगाव, तळा, पोलादपूर, महाड, पाली, गोरेगाव, सुधागड या ठिकाणी शेत भाड्याने घेऊन 20 ते 25 एकरात कलिंगडाची लागवड करीत असतात. पैसा व मेहनत याची सांगड घालून पिकाचे उत्पन्न घेतले जाते. त्यात हवामानाची चांगली साथ मिळाल्यास कलिंगड फळे मोठे चवदार होते, नाही तर शेतकर्याला नुकसान सहन करावे लागते. चालू वर्षी काहीशा खराब वातावरणामुळे कलिंगडाचे पीक वाया जाते की काय, अशी भीती शेतकर्यांना होती, परंतु कलिंगडाचे चांगले उत्पन्न आल्याने शेतकरी समाधानी आहे.