अलिबाग : प्रतिनिधी
सलग दोन दिवस रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूर तालुक्यात दोन ठिकाणी दरड कोसळली. त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक प्रभावित झाली होती. रोहा तालुक्यातील काही गावांमध्ये पाणी शिरल्यामुळे तेथील लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. नागोठणे आणि महाडमध्येही पाणी घुसून नुकसान झाले.
शुक्रवारी दुपारपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. शनिवारी (दि. 3) सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासांत सरासरी 163.45 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. दक्षिण रायगडात पावसाचा जोर होता. रोहा तालुक्यात सर्वाधिक 295 मिमी पावसाची नोंद झाली आहे. येत्या 24 तासांत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने रोहा तालुक्यातील रोठ गावात पाणी शिरले होते. तेथील आठ कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. आंबेवाडी येथे घरांमध्ये पाणी शिरल्याने 35 व्यक्तींना हलविण्यात आले.कोलाडमधील संजय गांधी नगरमधील 35 व्यक्तींना ग्रामपंचायत कार्यालयात स्थलांतरित करण्यात आले. धाटाव नाका रोड येथे पाणी घुसल्याने काही लोकांना जिल्हा परिषद शाळेत हलविण्यात आले. नागोठण्यातही पुन्हा पुराचे पाणी घुसले होते. त्याचप्रमाणे नागोठणे-कालकाई रस्त्यावर दरड कोसळली होती. ती हटविण्यात आली.
पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटात भोगाव येथे रस्ता खचला आहे. त्यामुळे तेथे एकेरी वाहतूक सुरू होती. गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मूर-वडवली रस्त्यावर पाणी आले होते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक थांबविण्यात आली. पोलादपूर-महाबळेश्वर रस्त्यावर झाड पडल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलादपूर तालुक्यात मुंबई-गोवा महामार्गावर चाळई येथे दरड कोसळल्याने महामार्गावरील वाहतूक काही काळ थांबविण्यात आली होती. सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे महाड शहरात पुराचे पाणी घुसले होते. म्हाप्रळ-पंढरपूर रस्त्यावरील रावढळ पुलावरून पाणी वाहत होते. त्यामुळे वाहतूक थांबविण्यात आली. माणगाव-गोरेगाव मार्गावरील मोर्बे पुलावरून पाणी वाहत असल्याने या मार्गावरील वाहतूकहीथांबविण्यात आली होती.
दरम्यान, माणगाव पोलीस ठाणे हद्दीत मुंबई-गोवा महामार्गावर गोद नदीवर असलेला कळमजे पूल असुरक्षित असल्याने तो वाहतुकीस बंद करण्यात आला आहे, तसेच दोन्ही बाजूंची वाहतूक थांबवून गोवा बाजूकडून येणारी वाहतूक निजामपूर नाका येथून निजामपूर-विळा-सुतारवाडीमार्गे कोलाड अशी वळविण्यात आली आहे, तर मुंबई बाजूकडून येणारी वाहतूक कोलाडमार्गे वळवून या ठिकाणी बंदोबस्त नेमण्यात आला आहे.
तालुकानिहाय पडलेला पाऊस (मिलीमीटरमध्ये)
अलिबाग 106, पेण 112, मुरूड 159, पनवेल 76.60, उरण 54, कर्जत 117.80, खालापूर 100, माणगाव 226, रोहा 295, सुधागड 175, तळा 210, महाड 188, पोलादपूर 245, म्हसळा 200, श्रीवर्धन 135, माथेरान 206. एकूण 2615.20, सरासरी 163.45.
अंबा नदीत युवक वाहून गेला
नागोठणे : वरवठणे येथील संतोष गडले (25) हा युवक नागोठण्यातील जुन्या पुलाजवळील पायरीवर हात धुवत असताना तोल जाऊन नदीत पडला. पाण्याचा प्रवाह जोरदार असल्याने तो वाहून गेला.