रसायनी-मोहोपाडा परिसरात कडकडीत बंद
मोहोपाडा : प्रतिनिधी
महिला रुग्णाशी गैरवर्तन करणार्या डॉक्टरचा बुधवारी (दि. 12) रसायनी, मोहोपाडा परिसरात बंद पाळून सर्वपक्षीयांनी निषेध केला. या वेळी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद होती. दरम्यान, रसायनी पोलिसांनी या डॉक्टरविरोधात आता विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
रुग्ण महिला व तिच्या कुटुंबीयांना डॉक्टरने धक्के मारून बाहेर काढल्याचा प्रकार 8 जुलै रोजी खालापूर तालुक्यातील रिस येथील हॉस्पिटलमध्ये घडला होता. डॉ. मंगेश बंग यांच्या हॉस्पिटलमध्ये समरीन कुरेशी ही महिला उपचार घेत होती. तिच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत नसल्याने भाऊ रेहमान लांबतुरे हे डॉ. बंग यांच्याकडे विचारपूस करण्यासाठी गेले असता याचा राग मनात धरून डॉक्टरने शिवीगाळी व दमदाटी करीत धक्के मारून हॉस्पिटलच्या बाहेर काढले. त्या वेळी त्यांनी रुग्ण महिलेचा हात पकडून अपशब्दही उच्चारले. याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या प्रकरणी रसायनी पोलिसांनी डॉक्टरविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली होती, मात्र या घटनेबद्दल लोकभावना तीव्र होती.
या घटनेचा निषेध करण्यासाठी व परिसरात पुन्हा असा प्रकार होऊ नये म्हणून बुधवारी मोहोपाडा, चांभार्ली, वावेघर, रिस, दांडफाटा, पराडे, येथील बाजारपेठा दुपारी 12 वाजेपर्यंत बंद ठेवून सर्वपक्षीयांनी मोहोपाडा येथे निषेध रॅली काढली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून रॅली सुरू होऊन बाजारपेठेतून मोहोपाडा नाक्यावर पोलीस चौकीजवळ शांततेत विसर्जित करण्यात आली. रुग्णांच्या भावना दुखावणार्या डॉक्टरविरोधात कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा; अन्यथा रसायनीतील सर्वपक्षीय पदाधिकारी पुढे विविध मार्गांनी आंदोलन सुरू ठेवतील, असा इशारा या वेळी देण्यात आला.
रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रूघ्न माळी यांनी आरोपी डॉ. मंगेश बंग यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा भा.दं.वि. कलम 354, 323, 504, 506 अन्वये दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.