Breaking News

तुम्ही आम्ही कप-बशा धुणारे!

मंत्री विजय वडेट्टीवारांचा ठाकरे सरकारला घरचा अहेर

जालना ः प्रतिनिधी
सत्ता आली तर तुम्ही आम्ही कोण तर कप-बशा धुणारे! चहा पिणारे नाही. त्यांनी खावा मटनाचा रस्सा आणि तुम्हाला भजा! आपण भजांवर खुश. अरे तो मटन खातोय आणि तुम्ही भजांवर खुश. तुम्ही आम्ही कुठे आहोत याचा विचारच आपण करीत नाही. ज्या दिवशी तुम्ही दुसर्‍याच्या ताटातील काढायला शिकाल त्या दिवशी खर्‍या अर्थाने ओबीसी हा मजबुतीने उभा झालाय हे चित्र रंगेल. ती ताकद तुम्हा आम्हाला सर्वांना मिळून निर्माण करायची आहे, असे म्हणत राज्याचे इतर मागासवर्गीय कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यांनी ठाकरे सरकारला घरचा अहेर दिला आहे. त्यांच्या या विधानाची चर्चा सुरू आहे.
जालना जिल्ह्यातील दोदडगाव येथे शनिवारी (दि. 7) मंडलस्तंभ अभिवादन आणि सामाजिक न्याय मेळावा झाला. त्या वेळी मंत्री वडेट्टीवार बोलत होते. माजी केंद्रीयमंत्री बबनराव ढाकणे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर उपस्थित होते.
या वेळी वडेट्टीवारांनी टोलेबाजी करताना म्हणाले की, मुख्यमंत्री कोण आणि पहिल्या बाकावर कोण हे सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही आम्ही कुठे आहोत? तो मटन खातोय आणि तुम्ही आम्ही भजे खाण्यातच खूश. भजांसोबत मिरची होती आणि त्यामध्ये कांदे होते याचीच तारीफ करतो. ते तुमच्या ताटातील काढून घेत आहेत याचा विचार करणार की नाही? मंत्रीपद काही कुणाच्या बापाची कायमची मिरासदारी नाही. आज आहे उद्या नाही. ज्यांच्यामुळे मंत्रिपद मिळाले त्या समाजासाठी आपण काय करतो हे महत्त्वाचे आहे. सत्ता कुणाकडे कायम नसते. याची अनेक उदाहरणे आहेत.

Check Also

पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य …

Leave a Reply