पाटणा : वृत्तसंस्था
प्रो कबड्डी लीगच्या पाटण्यामधील टप्प्याच्या अखेरच्या दिवशी पहिल्या सत्रात पिछाडीवर राहिलेल्या बंगाल वॉरियर्सने दुसर्या सत्रात जोरदार मुसंडी मारताना यू मुंबावर 32-30 असा रोमहर्षक विजय मिळवला, तर दुसर्या सामन्यात पाटणा पायरेट्सने यूपी योद्धावर 41-20 असा शानदार विजय मिळवला.
पाटलीपुत्र इनडोअर स्टेडियमवर झालेल्या पहिल्या सामन्यात यू मुंबाने 16-11 अशी मध्यंतराला आघाडी घेतली होती, परंतु दुसर्या सत्रात बंगालने सामन्यामधील रंगत वाढवली. के. प्रपंजन (सहा गुण), मणिंदर सिंग (पाच गुण) आणि बलदेव सिंग (पाच गुण) हे बंगालच्या विजयाचे शिल्पकार ठरले. यू मुंबाकडून अर्जुन देशवालने 10 गुण मिळवून लक्षवेधी कामगिरी केली.
बंगाल आणि मुंबई या दोन्ही संघांनी चांगल्या पकडी केल्या. या दोन्ही संघांनी पकडींमध्ये प्रत्येकी 10 गुणांची कमाई केली. चढायांमध्ये मात्र मुंबईपेक्षा बंगालचा संघ वरचढ ठरला. बंगालने चढाईमध्ये 17, तर मुंबईने 13 गुणांची कमाई केली. उभय संघांनी प्रतिस्पर्धी संघाला दोनदा ऑल आऊट केले. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी चार गुण मिळाले, पण मुंबईने बोनसच्या रूपात तीन आणि बंगालने एक गुण मिळवला.