Breaking News

कोविड सेंटरमध्ये महिला पोलिसांची नेमणूक करा

उरण तालुका भाजप महिला मोर्चाची मागणी

उरण ः वार्ताहर

कोविड सेंटरमधील महिला रुग्णांच्या सुरक्षेसाठी रुग्णालयात महिला पोलिसांची नेमणूक करावी, तसेच सीसीटीव्ही बसवून गस्त घालण्यात यावी, आदी मागण्या उरण तालुका भाजप महिला मोर्चा अध्यक्ष अ‍ॅड. राणी म्हात्रे यांनी मंगळवारी

(दि. 22) उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदिश कुलकर्णी तसेच उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्याकडे निवेदनाद्वारे केल्या आहेत.

निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत आहे. त्यातच महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कोविड सेंटरमध्ये महिला अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याचा आपण गांभीर्याने विचार करावा. उरण नगर

परिषदेशी योग्य संवाद साधून आपल्या अधिकार कक्षेत येणार्‍या प्रत्येक कोविड सेंटरमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात यावेत, तसेच महिला रुग्णांच्या सुरक्षेकरिता प्रत्येक कोविड सेंटरमध्ये 24 तास महिला पोलिसांची नेमणूक करावी. रात्रीच्या वेळेस कोविड सेंटरमध्ये महिला पोलिसांमार्फत गस्तही घालण्यात यावी.

दरम्यान, आपल्या मागण्यांची योग्य ती दखल न घेतल्यास भाजप महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश महिलांच्या सुरक्षेविषयक प्रश्नावरून राज्यव्यापी आंदोलन छेडेल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या वेळी उरण तालुका भाजप महिला मोर्चा अध्यक्ष अ‍ॅड. राणी म्हात्रे, नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उरण शहर महिला अध्यक्ष संपूर्णा थळी, नगरसेविका जान्हवी पंडित, उरण तालुका महिला उपाध्यक्ष निर्मला घरत, खोपटे सरपंच विशाखा ठाकूर, पूर्व विभाग महिला अध्यक्ष सुगंधा कोळी, उरण तालुका महिला सदस्य तथा कोप्रोली गाव अध्यक्ष निशा म्हात्रे, खोपटे गाव अध्यक्ष कलावती घरत आदी उपस्थित होत्या.

Check Also

पनवेलमध्ये रविवारी ’लाडक्या बहिणींचे लाडके देवाभाऊ’

पनवेल : रामप्रहर वृत्त महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण …

Leave a Reply