कर्जत : बातमीदार
रेल्वे प्रशासनाच्या अधिकारीवर्गाने अमन लॉज ते माथेरान रेल्वेमार्गाची पाहणी करीत माथेरान स्थानक गाठले. या वेळी त्यांनी नेरळ-माथेरान रेल्वेमार्गाचे काम येणार्या दोन-चार महिन्यांत युद्धपातळीवर पूर्ण करून लवकरच मिनीट्रेनची सेवा सुरळीत केली जाईल, असे स्पष्ट संकेत दिले. त्याचप्रमाणे शटल सेवा सुरू
करण्याकरिता कोणकोणत्या उपाययोजना कराव्या लागतील याचा आढावा घेतला. त्यामुळे माथेरानची रेल्वे अनिश्चित काळासाठी म्हणजेच दोन ते अडीच वर्षे बंद राहणार, या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे. माथेरानची लाइफ लाइन म्हणून ओळख असलेली नेरळ-माथेरान, तसेच माथेरान-अमन लॉज स्थानकांदरम्यान धावणारी माथेरानची राणी अर्थात मिनीट्रेन गेल्या आठवडाभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे घाटातील रेल्वेमार्गावर मोठ्या प्रमाणात दरडी पडल्याने ठप्प आहे. यामुळे रेल्वे प्रशासनाकडून सध्या सुस्थितीत असलेला माथेरान ते अमन लॉज रेल्वेमार्ग म्हणजेच शटल सेवादेखील बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या अनुषंगाने माथेरान ते अमन लॉज शटल सेवा सुरू राहावी, या मागणीसाठी सर्वपक्षीय नेतेमंडळींनी माथेरानकरांच्या वतीने मुंबई येथे 9 ऑगस्ट रोजी रेल्वे प्रशासनाला निवेदन दिले होते. त्यानंतर रेल्वे प्रशासनाच्या अधिकार्यांनी अमन लॉज ते माथेरान रेल्वेमार्गाची पाहणी करीत माथेरान स्थानक गाठले. या पाहणी दौर्यात रेल्वे बोर्डाचे सीएनडब्लू, पीडब्लूआय, तसेच लोकोचा अधिकारीवर्ग मोठ्या संख्येने होता. त्याचबरोबर माजी नगराध्यक्ष अजय सावंत, विवेक चौधरी, गटनेते प्रसाद सावंत, शिवसेना शहरप्रमुख चंद्रकांत चौधरी, जनार्दन पारटे आणि बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. रेल्वे अधिकार्यांनी माथेरान स्थानकाची पाहणी करून शटल सेवा सुरू करण्याकरिता कोणकोणत्या उपाययोजना कराव्या लागतील याचा आढावा घेताना येथील स्थानकात पीट लाइन (गोदी) बोगी संशोधन करण्यासाठी, तसेच इंजीन दुरुस्तीकरिता लोको शेडच्या उभारणीसाठी जागेची पाहणी केली.