Breaking News

तळीरामांनो सावधान!, कळंगुटकिनारी उघड्यावर मद्यपान करणार्यांवर कारवाई

म्हापसा ः वृत्तसंस्था

जगप्रसिद्ध कळंगुट समुद्रकिनार्‍यावर येणार्‍या देश-विदेशी पर्यटकांना यापुढे सावधगिरी बाळगावी लागणार आहे. पंचायत क्षेत्रात उघड्यावर दारूचे सेवन करणार्‍यांवर तसेच उघड्यावर कचरा टाकणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा पंचायतीने दिला आहे. तसा आदेश पंचायतीकडून जारी करण्यात आला आहे.

पंचायतीचे सरपंच शॉन मार्टीन्स यांच्या सहीनिशी जारी करण्यात आलेल्या आदेशात कळंगुट पंचायत क्षेत्रातील किनारी भागात रस्ते तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी दारूच्या सेवनावर बंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे एखादी व्यक्ती किंवा एकादा गट दारूचे सेवन करताना आढळल्यास व्यक्तीवर गोवा पर्यटन सुरक्षा व व्यवस्थापन कायदा 2001 अंतर्गतच्या कलम 9 अ (2) खाली दोन हजार रुपयांची, तर गटावर 10 हजार रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. लागू केलेला दंड जमा करण्यास नकार दर्शवल्यास त्याच्यावर कलम 10 (1) अंतर्गत कारवाई करण्यात येईल. या कायद्याखाली केलेला गुन्हा हा अदखलपात्र तसेच अजामीनपात्र गुन्हा म्हणून नोंद केला जाईल व दोषी आढळल्यास संबंधितांना किमान तीन महिन्यांची तसेच जास्तीत जास्त तीन वर्षांपर्यंत शिक्षाही होऊ शकते.

कळंगुट भागात दरवर्षी लाखोंनी पर्यटक येतात. त्यांच्याकडून दारूचे सेवन केल्यानंतर रिकाम्या बाटल्या उघड्यावर टाकून दिल्या जातात. काही वेळा त्या फोडूनही टाकल्या जातात. या आदेशामुळे या प्रकारांवर नियंत्रण येणार आहे. गोळा झालेला कचरा आपल्या हद्दीत जमा करून ठेवण्याची जबाबदारी पंचायत क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीची राहणार असून सदरचा कचरा पंचायतीकडून गोळा होईपर्यंत हद्दीतच निश्चित करण्यात आलेल्या जागेत ठेवण्यात यावा, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply