मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर घणाघात; महाजनादेश यात्रा नगरमध्ये
पाथर्डी : प्रतिनिधी
आमची यात्रा सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षांनीही यात्रा सुरू केल्या आहेत, परंतु त्याचा काही एक उपयोग होणार नाही; कारण 15 वर्षे सत्तेत असताना जनतेने त्यांची माजोरी अन् मुजोरी पाहिली आहे. त्यामुळे जनता त्यांच्या जवळ जात नाही. हरले तर ईव्हीएममुळे असा आरोप ते करतात, पण ईव्हीएम त्यांना हरवत नसून जनता हरवत असते, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केली. ते सोमवारी (दि. 26) महाजनादेश यात्रेनिमित्त पाथर्डीतील सभेत बोलत होते.
व्यासपीठावर पालकमंत्री राम शिंदे, खासदार सुजय विखे, आमदार मोनिका राजळे, शिवाजीराव कर्डिले, बाळासाहेब मुरकुटे, वैभव पिचड, सुरजीतसिंग ठाकूर, माजी खासदार दिलीप गांधी, माजी मंत्री बबनराव पाचपुते, नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, भाजपचे तालुकाध्यक्ष माणिकराव खेडकर आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कोणत्याही यात्रेचे एक दैवत असते. मी काढलेल्या यात्रेचे दैवत हे राज्यातील जनता असून, आजपर्यंत केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडण्यासाठी व जनतेशी संवाद साधत आशीर्वाद घेण्यासाठी मी महाजनादेश यात्रा काढलेली आहे. या यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आमचे पाहून विरोधकांनीही यात्रा सुरू केल्या असून, राष्ट्रवादीच्या दोन यात्रा, तर काँग्रेसची सुद्धा एक आजपासून सुरू होत आहे, मात्र 15 वर्षांचा त्यांचा काळ जनतेने पाहिला आहे. त्यामुळे जनता त्यांच्याबरोबर जाणार नाही.
सत्तेत असताना जनतेची कामे न केल्याने जनता त्यांच्यापासून दूर गेली. याउलट आम्ही प्रामाणिकपणे कामे केली. आलेल्या आव्हानांचा सामना केला व जनतेचे प्रश्न सोडविले. त्यांच्या सत्तेच्या 15 वर्षाच्या काळात जेवढी कामे झाली. त्यापेक्षा जास्त कामे आम्ही पाच वर्षांत करून दाखविली. त्यामुळे जनता आमच्या बरोबर आहे व येणारी 25 वर्षे सत्ता आमचीच येणार, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
ईव्हीएम 2004 साली देशात आले व 2014पर्यंत राज्यात व देशात काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता होती. त्या वेळी ईव्हीएम खराब नव्हते. मग भाजप जिंकायला लागला की ईव्हीएम खराब कसे काय झाले, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना केला. सुप्रिया सुळे जिंकल्या तेव्हा ईव्हीएम खराब नाही, मात्र डॉ. सुजय विखे जिंकले, तर हे ईव्हीएम खराब झाले, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी ईव्हीएम विरोधकांवर टीका केली.
दोन्हीही काँग्रेसने आता आपण केलेल्या चुकांबद्दल जनतेची माफी मागण्याचे काम करावे. तसे केल्यास थोडीफार मते त्यांना मिळतील व एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून त्यांना काम करता येईल, असा टोला या वेळी मुख्यमंत्र्यांनी लगावला.