Breaking News

प्रभात कोळीचा सन्मान; तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

महाराष्ट्राचे सुपुत्र मर्झबान पटेल यांना हॉकीतील योगदानासाठी द्रोणाचार्य जीवनगौरव, तर नितीन कीर्तने यांना टेनिसमधील योगदानासाठी ध्यानचंद पुरस्कार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 29) प्रदान करण्यात आला. जलतरणपटू प्रभात कोळी याला मानाच्या तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2019 प्रदान करण्यात आले. केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) किरेन रिजीजू, मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरीयाल निशंक, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. हर्षवर्धन आदी मंत्री, केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्या सचिव उपमा चौधरी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर या सोहळ्यास उपस्थित होते.

या शानदार कार्यक्रमात हॉकी प्रशिक्षक मर्झबान पटेल यांना द्रोणाचार्य जीवनगौरव, तर टेनिस प्रशिक्षक नितीन कीर्तने यांना ध्यानचंद पुरस्कार प्रदान करण्यात आला. सागरी जलतरणातील उत्तम कामगिरीसाठी जलतरणपटू प्रभात कोळी यास मानाच्या तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रत्येकी पाच लाख रुपये रोख, मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या तिन्ही पुरस्कारांचे स्वरूप आहे.

मर्झबान पटेल यांनी घडविले ऑलिम्पिक खेळाडू

हॉकी प्रशिक्षक मर्झबान पटेल यांनी गॅवीन फरेरा, वीरेंद्र स्केना, नासीर खान, युवराज वाल्मीकी, ड्रीन डिसुजा, देवेंद्र वल्मिकी आदी ऑलिम्पियन हॉकी खेळाडू घडवले आहेत. हॉकी प्रशिक्षक म्हणून निवृत्त झाल्यानंतरही पटेल यांनी प्रशिक्षण कार्य सुरूच ठेवले. ते गेल्या चार दशकांपासून मुंबईत गोरगरीब मुलांना हॉकीचे मोफत प्रशिक्षण देत आहेत. हॉकी प्रशिक्षक म्हणून दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाची दखल घेऊन त्यांना द्रोणाचार्य जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.

टेनिस प्रशिक्षक नितीन कीर्तने यांच्या योगदानाची दखल

मुंबईतील नितीन कीर्तने यांनी आशियाई क्रीडा स्पर्धा, आशिया चषक, दक्षिण आशिया क्रीडा स्पर्धांसह राष्ट्रीय स्पर्धांमध्ये विविध पदके जिंकली आहेत. वयाच्या पाचव्या वर्षापासूनच त्यांनी टेनिस खेळायला सुरुवात केली. त्यांनी एकेरी आणि दुहेरी टेनिस स्पर्धेत सहभाग घेऊन उत्तम क्रमवारी मिळविली आहे. निवृत्तीनंतर त्यांनी अनेक युवा टेनिसपटूंना प्रशिक्षण दिले. त्यांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांना ध्यानचंद पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सागरी साहसवीर

जलतरणपटू प्रभात कोळी

सर्वात कमी वयात जपान सुकानु चॅनेल पार करण्यासाठी आणि एक महिन्यापेक्षाही कमी कालावधीत दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनशेजारील सहा खुले वॉटर ब्रॉडकास्ट पूर्ण करण्याच्या कामगिरीसाठी प्रभात कोळी याची लिम्का बुक ऑफ नॅशनल रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. नवी मुंबई येथील नेरूळमधील प्रभात या 19 वर्षांच्या युवा जलतरणपटूने न्यूझीलंडमधील कूक स्ट्रीट, इंग्लिश खाडी, कॅटलिना, कैवी, सुगारू, नॉर्थ चॅनल, जिब्राल्टरची सामुद्रधुनी आणि केपटाऊनचा समुद्र असे आठ खडतर टप्पे पूर्ण केले आहेत.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply