पेण, अलिबाग : प्रतिनिधी
ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात अतिवृष्टीसह पुरामुळे पेण तालुक्यात झालेल्या जीवित व आर्थिक नुकसानीची केंद्रीय पथकाने शुक्रवारी (दि. 30) पाहणी करून माहिती जाणून घेतली. या वेळी कणे येथील ग्रामस्थांनी खारभूमी संरक्षक बंधार्याच्या मजबुतीकरणासाठी केंद्र शासनाने विशेष निधीची तरतूद करावी, अशी मागणी करण्यात आली.
या पथकात चित्तरंजन दास, मिलिंद पनपाटील, ओमकिशोर या केंद्रीय अधिकार्यांचा समावेश होता, तर त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, अपर जिल्हाधिकारी डॉ. भरत शितोळे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे, पेणच्या प्रांत अधिकारी प्रतिमा पुदलवाड, तहसीलदार डॉ. अरुणा जाधव, नायब तहसीलदार धनंजय कांबळे, गटविकास अधिकारी सी. पी. पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी
उपस्थित होते.
केंद्रीय पथकाने पेण तालुक्यातील वाशी, बोर्झे, वढाव, मोठे भाल, विठ्ठलवाडी, बहिरामकोटक, ठाकूरबेडी, मोठे वढाव, कान्होबा, कणे, तांबडशेत या पूरग्रस्त गावांची पाहणी केली आणि तेथे झालेल्या घरांची पडझड, शेततळे, गणपती कारखाना, शेती तसेच अन्य नुकसानीची माहिती
जाणून घेतली.
जिल्ह्यातील नुकसानीची माहिती देताना जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले की, जिल्ह्यात सर्व तालुक्यांना पुराचा आणि अतिवृष्टीचा अधिक फटका बसला. अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराचे पाणी नद्यांच्या धोका पातळीपेक्षा अधिक होते. सर्व तालुक्यातील ग्रामीण भागालाही याचा मोठा फटका बसला. या पुरामुळे घरांची पडझड झाली आणि भातपिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या काळात अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने तेथील लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. जिल्हा प्रशासनाने बचाव व मदतकार्यावर भर दिला होता. या वेळी डॉ. सूर्यवंशी यांनी जिल्ह्यात झालेल्या आर्थिक नुकसानीची माहिती केंद्रीय पथकाला दिली.