कर्जत : रामप्रहर वृत्त
तालुक्यातील भात पिकांमध्ये खोडकिड्यांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. कर्जत येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. एस. बी. भगत यांच्या नेतृत्वाखाली शास्त्रज्ञांच्या पथकाने वदप आणि कुंडलज गावातील शेतावर जाऊन पाहणी केली असता त्यांना भात पिकामध्ये खोडकिड्याची लागण झाल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांनी वदप येथील भैरवनाथ मंदिराच्या सभागृहात शेतकर्यांची बैठक घेऊन खोडकिड्याच्या निर्मूलनासाठी मार्गदर्शन केले.
खोडकिडा ही भातपिकावर पडणारी सर्वात हानिकारक कीड असून ही फक्त भातावरच उपजीविका करते. ही कीड प्रामुख्याने ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील दुबार पिकाखालील क्षेत्रात प्रतिवर्षी नुकसान करताना आढळते. सद्यस्थितीत भात पिकांची पुनर्लागवड पूर्ण झालेली असून भात पीक फुटण्याच्या अवस्थेत असून अधूनमधून पडणारा पाऊस, पिकाची जोमदार वाढ व हवेतील गारवा अशा प्रकारचे हवामान खोडकिडा या किडीसाठी उपयुक्त आहे. त्यामुळे शेतकर्यांनी आपल्या पिकांचीं नियमित पाहणी करून खोडकिड्यांचा प्रादुर्भाव आढळून आल्यास काय करावे याचे मार्गदर्शन या वेळी करण्यात आले तसेच या वेळी भात पिकातील खोडकिड्याच्या विविध अवस्थाही शेतकर्यांना प्रत्यक्षात
दाखविण्यात आल्या.
शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाचे सदस्य निलीकेष दळवी (रा. वदप) यांनी आयोजित केलेल्या या बैठकीला 27 शेतकरी उपस्थित होते. त्यांना कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. एस. बी. भगत यांच्या नेतृत्वाखाली शास्त्रज्ञांच्या पथकाने मार्गदर्शन केले. त्यात कीटकशास्त्रज्ञ डॉ. विनायक जालगावकर, वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉ. जीवन कदम, विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने व कनिष्ठ संशोधन सहाय्यक डॉ. हेमंत पवार यांचा समावेश होता.
RamPrahar – The Panvel Daily Paper