Breaking News

पावसाने उमेदवार टेन्शनमध्ये…..

नेरळमध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त

कर्जत : बातमीदार

नेरळ ग्रामपंचायतीवर आपला झेंडा रोवण्यासाठी जोरदार चुरस दिसून येत आहे, मात्र शुक्रवार सायंकाळपासून सुरू झालेल्या पावसामुळे आज सकाळी मतदार मतदानासाठी बाहेर निघत नव्हते. त्यामुळे निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांची धाकधूक वाढली आहे, मात्र दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतल्याने चांगले मतदान झाले. या वेळी पोलीस दलाने चोख बंदोबस्त ठेवल्याने कोणताही अनुचित प्रकार न घडता मतदान शांततेत पार पडले.

नेरळ ग्रामपंचायतीमधील 17 जागांसाठी आणि थेट सरपंच पदासाठी शनिवारी (दि. 31) मतदान घेण्यात आले. त्याच वेळी कर्जत तालुक्यातील उमरोली, जामरूंग, रजपे आणि वाकस या ग्रामपंचायतींसाठीही मतदान घेण्यात आले, मात्र जिल्ह्यातील प्रतिष्ठेची ग्रामपंचायत असलेल्या नेरळकडे सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागून राहिले आहे. येथे शिवसेना-भाजप-आरपीआय युती आणि राष्ट्रवादी काँग्रेस-शेकाप-मनसे-काँग्रेस आघाडीमध्ये सरळ लढत होत आहे. थेट सरपंच पदासाठी चार उमेदवार रिंगणात उतरले आहेत, तर सहा प्रभागांतील 17 जागांसाठी 44 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. नेरळ ग्रामपंचायतीच्या सर्व सहा प्रभागांत अटीतटीची लढत होत असून दिग्गज उमेदवार निवडणूक लढवीत असल्याने चुरस वाढली आहे. शनिवारी सकाळी मतदान सुरू झाले, तेव्हापासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मतदानाच्या टक्केवारीवर मोठा फरक पडलेला दिसून आला. दुपारी 1 वाजेपर्यंत प्रभाग एकचा अपवाद वगळता जेमतेम 25 टक्के मतदानाची नोंद झाली होती.

14050 मतदार असलेल्या नेरळ ग्रामपंचायतीमधील सहा प्रभागांचे मतदान वेगवेगळ्या 18 ठिकाणी घेण्यात आले. प्रभाग एकचे मतदान हे जिल्हा परिषदेच्या जुम्मापट्टी, आनंदवाडी आणि दगडी शाळेतील वर्गात घेण्यात आले, तर प्रभाग दोनमधील मतदान हे विद्या विकास शाळेतील तीन केंद्रांत घेण्यात आले. प्रभाग तीनचे मतदान कुंभारआळी येथील शाळेतील तीन वर्ग खोल्यांत उभारण्यात आलेल्या मतदान केंद्रात घेण्यात आले. प्रभाग चारचे मतदान हे कन्याशाळेतील तीन मतदान केंद्रांत घेण्यात आले. प्रभाग पाचचे मतदान विद्या विकास शाळेच्या तीन वर्ग खोल्यांत उभारण्यात आलेल्या मतदान केंद्रात घेण्यात आले.त्या वेळी प्रभाग सहा या जास्त मतदार असलेल्या प्रभागाचे मतदान दगडी शाळेत उभारण्यात आलेल्या चार मतदान केंद्रात घेण्यात आले.

व्यापार्‍यांचे नुकसान

नेरळ बाजारपेठ भागात असलेल्या मतदान केंद्रापासून 100 मीटर आत येणारी सर्व दुकाने बंद ठेवण्याच्या सूचना महसूल विभागाने व्यापार्‍यांना केल्या होत्या. त्यामुळे ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर व्यापार्‍यांचे मोठे नुकसान झाले. दुसरीकडे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मोठा पोलीस बंदोबस्त मागविण्यात आल्याने आणि तो सर्व मतदान केंद्र परिसरात तैनात असल्याने मतदान काळात कुठेही तणाव निर्माण झाला नाही.

यांच्यात चुरस

या निवडणुकीत थेट सरपंच पदासाठी युतीचे रावजी शिंगवा  आणि आघाडीचे धाऊ उघडे यांच्यात चुरशीची लढत होत आहे, त्या वेळी अपक्ष उमेदवार कविता शिंगवा आणि प्रवीण ब्रह्मांडे हे किती मते घेतात याकडेदेखील लक्ष लागून राहिले आहे. सदस्य पदासाठी प्रभाग एकमध्ये मंगेश म्हसकर, संजय गवळी, अश्विनी पारधी, सदानंद शिंगवा हे प्रमुख उमेदवार आहेत, तर प्रभाग दोनमध्ये मनमोहन बोरसे, धर्मानंद गायकवाड, मीना पवार हे प्रमुख उमेदवार असून प्रभाग तीनमध्ये अंकुश शेळके, बाबू मरे, शंकर घोडविंदे, शारदा साळेकर यांच्यात लढत आहे. प्रभाग चारमध्ये अतुल चंचे, योगेश ठक्कर, जयश्री मानकामे, माया शहा हे प्रमुख उमेदवार लढत आहेत. प्रभाग पाचमध्ये संतोष शिंगाडे, राजन लोभी, विश्वनाथ जामघरे, मृणाल खेडकर आणि प्रभाग सहामध्ये प्रथमेश मोरे, संजीवनी हजारे, अजिंक्य मनवे या उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply