Breaking News

पनवेल परिसरात आलेल्या विविध प्रकल्पांमुळे पुढच्या पिढीला इथेेच रोजगार मिळणार

आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल परिसरात आलेल्या विविध प्रकल्पांमुळे आता पुढच्या पिढीला पनवेलमध्येच रोजगार मिळणार आहे, असे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी (दि. 9) येथे केले.
शिवसेनेचे महानगरप्रमुख अ‍ॅड. प्रथमेश सोमण व पदाधिकार्‍यांच्या पुढाकाराने झालेल्या बैठकीत शिवसेनाप्रणित शिवप्रेरणा श्रमिक कामगार संघटना आणि एकता चालक मालक संघटनेने महायुतीचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांना पाठिंबा जाहीर केला. त्या वेळी ते बोलत होते.
या बैठकीस शिवसेनेचे महानगरप्रमुख अ‍ॅड. प्रथमेश सोमण, उपमहानगरप्रमुख महेश सावंत, शहरप्रमुख प्रसाद सोनावणे, विभागप्रमुख किरण पवार, प्रसिद्धीप्रमुख तौफिक बागवान, उपशहरप्रमुख मच्छिंद्र झगडे, शिवप्रेरणा श्रमिक कामगार संघटनेचे अनिल गागडा, अनिल धोत्रे, प्रदीप इंदवटकर, रमेश बैद, भगवान पाटील, बाळू मंजुळे, एकता चालक मालक संघटनेचे शशिकांत सावंत, अझमत डोलारे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुढे बोलताना सांगितले की, पनवेल परिसरात विमानतळ, मेट्रो आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी नागरीकरण आणि त्यांना सेवा सुविधा वाढणार आहेत. त्याचबरोबर तळोजात 80 हजार कोटी रुपयांचा सेमी कंडक्टर प्रकल्प येणार आहे. त्यामुळे या ठिकाणी रोजगाराची मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होणार असून भावी पिढीला रोजगार, नोकरीसाठी बाहेर जावे लागणार नाही, तर पनवेलमध्येच ही संधी मिळणार आहे.
महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बांधले होते. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या तडफेने काम केले ती तडफ कायम राहण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी भाजपसोबत सरकारमध्ये येण्याचा निर्णय घेतला असल्याचे नमूद करून आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, सरकारच्या योजना सर्वांना मिळाल्याच पाहिजे यासाठी आपण नेहमी आग्रही राहिलो आहोत. पुढील काळातही त्याची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांचा विचार करणारे सरकार अर्थात महायुतीचे सरकार असणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्व नागरिकांची साथ मला ताकद देणार असून तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून मी कायम तुमच्या पाठीशी ठामपणे उभा राहीन, असा विश्वास या बैठकीच्या अनुषंगाने त्यांनी पनवेलच्या जनतेला दिला.
लाडकी बहीण योजना, अन्नपूर्णा, मुलींना मोफत उच्च शिक्षण, एसटी प्रवासात सवलत, पंतप्रधान आवास योजना, महात्मा फुले आरोग्य योजना, पीएम किसान योजना अशा विविध लोकहिताच्या योजना राबवतानाच विमानतळ, अटल सेतू, मेट्रो, पायाभूत सुविधा देण्याचे काम केंद्र व राज्य सरकारने केले आहे. राज्याच्या विकासाचा आलेख चढत्या क्रमाने राहण्यासाठी महायुतीचे सरकार पुन्हा येणे गरजेचे आहे, असे सांगतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आपला देश शक्ती झाल्याचे जग मानते आहे. राज्यातही महायुतीचे सरकार पूर्ण ताकदीने कार्यरत आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्यातील दोन कोटींहून अधिक बहिणींना झाला आहे. ही योजना बंद करण्यासाठी काँग्रेस कोर्टात गेली होती, तर शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार हे पक्ष योजना बंद करणार असल्याचे स्पष्ट बोलत होते. आता मात्र त्यांनी निवडणुका जाहीर होताच नेहमीप्रमाणे घुमजाव केले आहे, मात्र त्यांच्यावर विश्वास ठेवून चालणार नाही, कारण ही योजना बंद करण्यासाठी महाविकास आघाडीकडून प्रयत्नांची पराकाष्टा झाली. मार्च 2025पर्यंत या योजनेच्या आर्थिक निधीची तरतूद महायुती सरकारने आधीच केलेली आहे. त्यामुळे बहिणींनी चिंता करण्याची गरज नाही. आता या योजनेत आर्थिक वृद्धी केली जाणार आहे. तुम्हाला सर्व योजना मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
रिक्षाचालकांच्या हितासाठी राज्य सरकारने महामंडळाची स्थापना केली आहे. त्या अनुषंगाने निवृत्तीनंतर चालकांना आर्थिक मदत आणि सुविधा मिळाली पाहिजे यासाठी महायुती सरकार प्रयत्नशील असून त्या तुमचे प्रश्न सोडविण्यासाठी मी तत्पर आहे. पनवेलमध्ये विकास करण्याची ताकद केंद्र व राज्य सरकार आणि सर्व नागरिकांनी दिली आहे. यापुढेही ताकद माझ्या पाठीशी ठेवा, असे आवाहनही त्यांनी या वेळी तमाम जनेतला केले.
अ‍ॅड. प्रथमेश सोमण यांनी म्हटले की, आमदार प्रशांत ठाकूर यांनी कधीही राजकारण केले नाही. कुठल्याही पक्षाचा किंवा संघटनेचा व्यक्ती असो त्याच्या प्रश्नाची सोडवणूक करण्याचे काम त्यांनी केले आहे. पक्ष संघटना म्हणून आम्ही त्या वेळी विरोधी पक्षात असतानाही त्यांनी कधीच राजकारण केले नाही. कामगार आणि रिक्षाचालकांच्या हितासाठी त्यांनी नेहमीच सहकार्य केले. रिक्षाचालकांमध्ये काही जण फूट पडतात, पण ते आपण होऊ द्यायचे नाही, असे सांगतानाच विरोधक हिंदू-मुस्लिम असे राजकरण करतील, पण विरोधकांच्या भूलथापांना आणि अप्रचाराला बळी पडू नका, असे आवाहनही त्यांनी कामगार आणि रिक्षाचालकांना केले. आमदार प्रशांत ठाकूर विजयाचा चौकार मारण्यासाठी सज्ज आहेत. फक्त त्यांना मताधिक्य द्यायचे आहे, असेही सोमण यांनी स्पष्ट केले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply