पेण : प्रतिनिधी
निसर्ग चक्रीवादळात पेण पोलीस ठाण्याच्या वसतीगृहावर झाड पडले होते, ते अद्याप न हटवल्याने येथे येणार्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. याप्रकरणी वन विभाग आणि दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकार्यांनी प्रशासनाकडे अनेक पत्रव्यवहार करूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
निसर्ग चक्रीवादळ झाल्यानंतर संबंधित प्रशासनाकडून पाहणी करण्यात आली होती. त्याचप्रमाणे पंचनामे करणे किंवा उन्मळून पडणार्या झाडांना बाजूला करण्याचे कामही करण्यात आले होते. मात्र, खुद्द एका शासकीय जागेत उन्मळून पडलेल्या या झाडाकडे प्रशासनाचेच दुर्लक्ष झाले आहे. या परिसरात दुय्यम निबंधक आणि वन विभागाची कार्यालये आहेत, अर्धवट मोडकळीस आलेल्या या झाडामुळे येथील कार्यालयांत जीव मुठीत धरून ये-जा करावी लागते.
या पडलेल्या झाडाची विल्हेवाट लावण्यासाठी वन विभाग आणि दुय्यम निबंधक कार्यालयाने पेण सार्वजनिक बांधकाम विभाग, तहसील कार्यालय आणि पेण पोलीस ठाण्यात पत्रव्यवहार केला आहे, मात्र त्याकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केले आहे. हे झाड लवकरात लवकर येथून हटवावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.