Breaking News

कर्जतचे संतोष दातीर व रवी काजळे राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

कर्जत : बातमीदार

तालुक्यातील दहिगाव येथील शाळेचे उपक्रमशील शिक्षक संतोष दातीर आणि झुगरेवाडी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक रवी काजळे यांना राज्य सरकारने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले. मुंबईतील रंगशारदा सभागृहात गुरुवारी (दि. 5) झालेल्या सोहळ्यात राज्याचे उच्चतंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि शिक्षणमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते संतोष दातीर व रवी काजळे यांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.  या वेळी शिक्षक आमदार कपिल पाटील, राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोलंकी, क्रीडा आणि युवक कल्याण विभागाचे सचिव सौरभ विजय, शिक्षण संचालक दिनकर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कर्जत तालुक्यातील दहिगाव प्राथमिक शाळेचे उपक्रमशील शिक्षक संतोष दातीर यांच्या उपक्रमाची राज्यस्तरीय शिक्षणाची वारीमध्ये सतत दोन वर्षे निवड झाली असून, यावर्षी शाळाबाह्य मुलांसाठी त्यांनी राज्यस्तरीय भरीव काम केले आहे, तसेच दिक्षा व मित्रा अ‍ॅपसाठी त्यांनी विविध घटकांवर ई-लर्निंग साहित्य व्हिडीओ बनविले आहेत. त्यांना यापूर्वी तालुका, जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. झुगरेवाडी या आदिवासी भागातील शाळेत मुख्याध्यापक म्हणून रवी काजळे गेली सहा वर्षे काम करीत आहेत. अल्पावधीत शाळा डिजिटल करणारे काजळे हे रविवारीदेखील सुटी घेत नाहीत. शाळेत त्यांनी स्पोकन इंग्लिश व ब्रिटिश कौन्सिल आदी उपक्रम यशस्वी केले आहेत. विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाची गोडी लावणे तसेच आदिवासी बोलीभाषा इत्यादी उपक्रम त्यांनी शाळेत राबविले आहेत.

Check Also

झालमुरी, एसडी, आरडी आणि सुरांची अवीट मैफल!

‌‘पुरवैय्या‌’ने पनवेलकरांना दिली अविस्मरणीय सांगीतिक पर्वणी पनवेल : रामप्रहर वृत्तपश्चिम बंगालने हिंदी चित्रपटसृष्टीला अनिल विश्वास, …

Leave a Reply