कर्जत ः बातमीदार
189 कर्जत विधानसभा मतदारसंघात दोन लाख 81 हजार 877 मतदार असून पुरुष मतदार कर्जत विधानसभा मतदारसंघात अधिक आहेत. या मतदारसंघात चार मतदान केंद्रे ही दुर्गम भागात असून 326 मतदान केंद्रांवर मतदान घेतले जाणार आहे. दरम्यान, 21 ऑक्टोबर रोजी होत असलेल्या मतदानासाठी साधारण 1500 अधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणी कर्जत-कल्याण राज्यमार्ग रस्त्यावरील शेळके मंगल कार्यालयात होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली परदेशी यांनी दिली. 2014मध्ये नव्याने अस्तित्वात आलेल्या कर्जत विधानसभा मतदारसंघात 21 ऑक्टोबर रोजी मतदान घेतले जाणार आहे. 27
सप्टेंबरपासून नामांकन अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून 4 ऑक्टोबरपर्यंत नामांकन अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. अर्जांची छाननी 5 ऑक्टोबरला होणार असून 7 ऑक्टोबरला अर्ज मागे घेता येतील. तेव्हाच निवडणूक लढवणार्या अधिकृत उमेदवारांची निशाणीसह यादी प्रसिद्ध केली जाईल. उमेदवारांना निवडणूक काळात 26 लाख रुपये खर्चाची मुभा आयोगाने दिली. निवडणुकीसाठी 4 ऑक्टोबरपर्यंत नवीन मतदारांना नाव नोंदविण्याची संधी देण्यात आली आहे.