नागोठणे : प्रतिनिधी
रिलायन्स कंपनीकडून विभागातील नागरिकांसाठी मोफत उपलब्ध असलेला फिरता दवाखाना आपल्या ग्रामपंचायत हद्दीतील गावांसाठीसुद्धा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी शिहू ग्रामपंचायतीकडून करण्यात आली होती, मात्र या पत्रानंतर काही दिवसांतच या मागणीला तूर्त स्थगिती द्यावी, अशी मागणी ग्रामपंचायतीकडून केली गेली असल्याने ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. सरपंच पल्लवी भोईर येथे उपलब्ध नसल्याने कंपनीकडे पाठवलेल्या मागणीपत्रावर फक्त ग्रामसेवकाचीच सही होती. सरपंच भोईर यांनी स्वतःची सही नसल्याची नाराजी व्यक्त करीत या मागणीला तूर्त स्थगिती देण्याचा आदेश दिल्याने फिरत्या दवाखान्याला तूर्त स्थगिती द्यावी, असे पत्र रिलायन्स कंपनीच्या जनसंपर्क अधिकार्यांना पाठवले असल्याचे ग्रामसेवक मनोज दहिवदकर यांनी स्पष्ट केले. ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत फिरता दवाखाना आपल्या भागातसुद्धा उपलब्ध व्हावा, असा ठराव पारित करण्यात आला होता. तसे पत्र रिलायन्स कंपनीला पाठविले आहे, मात्र कोणाच्या तरी सांगण्यावरून पुन्हा मागणीस तूर्त स्थगिती द्यावी असे पत्र पाठवल्याने गोरगरीब जनतेचा हा एकप्रकारे अपमानच झाला असल्याची भावना ग्रामपंचायत सदस्य गणपत खाडे यांनी व्यक्त केली. उत्कृष्ट उपचार होत असल्याने या फिरत्या दवाखान्याचा येथील सामान्य जनतेला निश्चितच फायदा होणार होता. मात्र काहीतरी कारणे सांगून या मागणीला तूर्त स्थगिती द्यावी, असे पत्र पाठवणे हे निषेधार्ह असून, हा फिरता दवाखाना या ठिकाणी चालू करण्यासाठी गणपत खाडे धडपडत आहेत. हे स्वागतार्ह असून आमचे त्यांना कायम सहकार्यच असेल, असे सामाजिक कार्यकर्ते वसंत मोकल आणि माजी सरपंच भास्कर म्हात्रे यांनी या वेळी सांगितले.