
कर्जत ः बातमीदार
गावे आणि शहरे ही प्लास्टिकमुक्त व्हावीत, यासाठी देशाच्या पंतप्रधानांनी सुरू केलेले अभियान देशाला स्वच्छतेच्या बाबतीत आणखी वरच्या पातळीवर नेणारे आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेने प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांपासून या अभियानाची केलेली सुरुवात ही कौतुकास्पद असून विद्यार्थ्यांना प्लास्टिकबंदीची जाणीव करून देणे महत्त्वाचे असल्याचे मत रायगड जिल्हा परिषदेचे समाजकल्याण समिती सभापती नारायण डामसे यांनी व्यक्त केले. रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोठिंबे येथील प्राथमिक शाळेमध्ये प्लास्टिकमुक्त अभियान राबविण्यात आले. 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्ताने स्वच्छता ही सेवा मोहीम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली आहे. त्याअंतर्गत गावे आणि शहरे प्लास्टिकमुक्त करण्याबाबत जनजागृती केली जात आहे. रायगड जिल्हा परिषद समाज कल्याण समितीचे सभापती नारायण डामसे यांच्या उपस्थितीत रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विद्यार्थी आणि शिक्षक तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि ग्रामस्थ यांनी कोठिंबे गावातील गल्लीबोळात जाऊन प्लास्टिक कचरा जमा केला. तो सर्व कचरा गावाबाहेर एकत्र करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक छगन मेंगाळ, पदवीधर शिक्षक देविदास पाटील, विजय जगताप यांनीदेखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मनेश अलीमकर, शिक्षक अपिनाथ थैल, रिना ऐनकर यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.